गुटखा बंदीच्या मुद्यावरून 'द्रमुक'चा सभात्याग

वृत्तसंस्था
गुरुवार, 29 जून 2017

मंत्र्यांनी लाच घेतल्याचा विरोधकांकडून आरोप

चेन्नई: राज्यात बंदी असलेल्या गुटख्याच्या विक्रीसाठी तमिळनाडूचे मंत्री आणि काही अधिकाऱ्यांनी लाच घेतल्याचा गंभीर आरोप करत विरोधी पक्ष द्रमुकच्या आमदारांनी आज सभात्याग केला. गुटख्यावरील बंदी वाढविण्यास सत्ताधारी पक्षाने नकार दिल्यानंतर विरोधकांनी सभात्याग केला. या वेळी विरोधकांनी या संदर्भात वृत्तपत्रांत छापून आलेल्या बातम्या आणि वृत्तपत्रे सभागृहात फडकवली

विधानसभेतील विरोधी पक्षनेते एम. के. स्टॅलीन यांनी प्राप्तिकर विभागाने गुटखा उत्पादकांवर नुकत्याच टाकलेल्या छाप्यांचा उल्लेख केला. त्यावर वृत्तपत्रांत छापून आलेल्या मुद्यावर चर्चा करण्यास विधानसभेचे अध्यक्ष पी. धनपाल यांनी विरोधकांना परवानगी नाकारली.

ते म्हणाले, "वृत्तपत्रांत छापून आलेल्या बातम्या हा पुरावा नसल्याने त्यावर चर्चा करता येणार नाही. या प्रकरणासंदर्भात स्टॅलीन यांनी सादर केलेली कागदपत्रांबाबत आपण चौकशी केली आहे.'' स्टॅलीन यांनी सभागृहात बोलताना वापलेले संदर्भ अध्यक्षांनी कामकाजातून काढून टाकले. त्यावर द्रमुकचे उपनेते दुराई मुरुगन चर्चा करण्याच्या मुद्यावर ठाम राहिले. त्याचवेळी द्रमुकचे सर्व आमदार उठून उभे राहिले व काही जणांनी सभागृहात वृत्तपत्रे फडकवली. यावर, तुम्ही पुरावे घेऊन या. त्याचा अभ्यास केल्यानंतर या विषयावर बोलण्याची मी तुम्हाला परवानगी देईन, असे धनपाल यांनी सांगितले.