सीआरपीएफकडून 20 नक्षलवाद्यांना कंठस्नान

वृत्तसंस्था
बुधवार, 17 मे 2017

या मोहिमेमध्ये "कोब्रा युनिफॉर्म' घातलेले 20 नक्षलवाद्यांना दिसताच त्यांना ठार करण्यात आले. या मोहिमेमध्ये 2 पोलिस कर्मचाऱ्यांनाही वीरमरण आले...

विजापूर - छत्तीसगड राज्यामधील विजापूर जिल्ह्यामध्ये केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) नेतृत्वाखाली राबविण्यात आलेल्या संयुक्त मोहिमेमध्ये 20 नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले.

ही मोहिम गेल्या रविवारी राबविण्यात आल्याची माहिती सीआरपीएफ महासंचालकांनी दिली. या मोहिमेमध्ये सुमारे साडेतीनशे जवानांचा समावेश होता. या मोहिमेमध्ये "कोब्रा युनिफॉर्म' घातलेले 20 नक्षलवाद्यांना दिसताच त्यांना ठार करण्यात आले. या मोहिमेमध्ये 2 पोलिस कर्मचाऱ्यांनाही वीरमरण आले. तसेच यावेळी झालेल्या धुमश्‍चक्रीमध्ये जखमी झालेल्या जवानांना भारतीय हवाई दलाने तातडीने हवाईमार्गे रायपूर येथील रामकृष्ण रुग्णालयात दाखल केले.

छत्तीसगड राज्यामधील सुकमा भागामध्ये काही दिवसांपूर्वीच नक्षलवाद्यांनी घडविलेल्या हल्ल्यात 25 जवान हुतात्मा झाले होते. या हल्ल्यामुळे देशभरात खळबळ उडाली होती. या पार्श्‍वभूमीवर, राबविण्यात आलेल्या या मोहिमेमध्ये नक्षलवाद्यांना प्रभावी प्रत्युत्तर देण्यात आले आहे. नक्षलवाद्यांविरोधात आक्रमक धोरण राबविण्याचे संकेत केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी काही दिवसांपूर्वीच दिले होते. या पार्श्‍वभूमीवर राबविण्यात आलेली ही मोहिम अत्यंत संवेदनशील मानण्यात येत आहे.