दंतेवाड्यात पोलिसांची आजारी महिलेला मदत; स्ट्रेचरवरून वाहून आणले

वृत्तसंस्था
सोमवार, 4 सप्टेंबर 2017

रायपूर: छत्तीसगडमधील दंतेवाडा या नक्षलग्रस्त जिल्ह्यातील आजारी आदिवासी महिलेला केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या पोलिसांनी (सीआरपीएफ) स्ट्रेचरवरून सात कि. मी.पर्यंत पायी चालत वाहून आणले.

रायपूर: छत्तीसगडमधील दंतेवाडा या नक्षलग्रस्त जिल्ह्यातील आजारी आदिवासी महिलेला केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या पोलिसांनी (सीआरपीएफ) स्ट्रेचरवरून सात कि. मी.पर्यंत पायी चालत वाहून आणले.

काटेकल्याण पोलिस स्थानकांतर्गत नक्षलग्रस्तांविरोधात मोहिमेवरुन "सीआरपीएफ'च्या 195 व्या बटालियनच्या पोलिसांचा गट रविवारी (ता.3) परतत असताना नयनार गावात रस्त्याच्या कडेला एक महिला पडलेली दिसली. त्यांनी चौकशी केली असता कोसी (वय 40) नावाच्या महिलेने तिला ताप आल्याचे सांगितले. तिचे दोन महिन्यांचे बाळ जवळच रडत होते. तिचा पती किंवा नातेवाईक मात्र कोणी नव्हते. हा भाग डोंगराळ असल्याने हेलिकॉप्टरच्या सहाय्याने तिला तेथून हलविणे शक्‍य नव्हते. तसेच नक्षलवाद्यांनी या भागातील रस्ते उखडल्याने गावाचा अन्य जगाची संपर्क तुटलेला आहे. त्यामुळे रुग्णवाहिका बोलवून उपयोग होणार नव्हता. त्यामुळे पोलिसांनी काटक्‍यांचे स्ट्रेचर तयार केले. त्यात आजारी महिलेला ठेवून मुलाला खांद्यावर उचलून जवानांनी सात कि. मी.पर्यंतचे अंतर पायी पार केले. डोंगर नद्या ओलांडत ते गाताम गावात पोचले. त्यानंतर रुग्णवाहिकेतून तिला काटेकल्याण येथील आरोग्य केंद्रात पोचविण्यात आले. संबंधित महिला व तिच्या मुलावर रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्‍टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.