उत्तराखंडमध्ये चीनने घुसखोरी केल्याचे उघड; मेंढपाळांना धमकावले

वृत्तसंस्था
सोमवार, 31 जुलै 2017

1958 मध्ये भारत आणि चीनने चर्चा करून बारहोती हा वादग्रस्त भाग म्हणून मान्य करत येथे सैन्य न पाठविण्याचे मान्य केले होते. 1962 च्या युद्धातही चीनने मध्य भागात सैन्य घुसविले नव्हते, तर पूर्व भाग (अरुणाचल प्रदेश) आणि पश्‍चिम भागामध्ये (लडाख) कारवाया केल्या होत्या

नवी दिल्ली - चीनी सैनिकांनी गेल्या आठवड्यात उत्तराखंडमधील चामोली जिल्ह्यात एक किलोमीटर आत घुसखोरी करत मेंढपाळांना धमकावल्याचे उघड झाले आहे. 25 जुलैला बारहोती भागात ही घटना घडली. डोकलाम वादाच्या पार्श्‍वभूमीवर या घटनेला महत्त्व आले आहे.

एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर दिलेल्या माहितीनुसार, चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीच्या सैनिकांनी 25 जुलैला सकाळी घुसखोरी करत मेंढपाळांना जागा सोडून जाण्यास धमकावले. बारहोती हा 80 किमीचा उताराचा पट्टा असून उत्तराखंडची राजधानी डेहराडूनपासून 140 किमी अंतरावर आहे. उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड राज्यांचा समावेश असलेल्या या "मध्य भागा'त (मिडल सेक्‍टर) बारहोती हे सीमेवरील ठाणे आहे. हा लष्करमुक्त भाग असून भारत-तिबेट सीमा पोलिस दलाच्या (आयटीबीपी) जवानांना येथे शस्त्रे घेऊन येण्याची परवानगी नाही.

1958 मध्ये भारत आणि चीनने चर्चा करून बारहोती हा वादग्रस्त भाग म्हणून मान्य करत येथे सैन्य न पाठविण्याचे मान्य केले होते. 1962 च्या युद्धातही चीनने मध्य भागात सैन्य घुसविले नव्हते, तर पूर्व भाग (अरुणाचल प्रदेश) आणि पश्‍चिम भागामध्ये (लडाख) कारवाया केल्या होत्या.

सीमावादाबाबत जून 2000 मध्ये झालेल्या चर्चेवेळी, बारहोती, कौरील आणि शिपकी या तीन भागांमध्ये "आयटीबीपी'चे जवान शस्त्रे घेऊन जाणार नाहीत, असे भारताने मान्य केले होते. त्यामुळे जवान येथे नागरी वेशात गस्त घालत असतात. या भागात भारतीय मेंढपाळ आणि तिबेटमधील लोक त्यांचे याक चरण्यासाठी घेऊन येतात.