श्रीनगरमध्ये मतदानावेळी राडा; 1 मृत्युमुखी

वृत्तसंस्था
रविवार, 9 एप्रिल 2017

येथे झालेल्या गोंधळाला सरकार जबाबदार असून, निवडणुका यशस्वीपणे शांततेत पार पाडण्यात सरकार अपयशी ठरले आहे, असे अब्दुल्ला यांनी सांगितले. 

श्रीनगर / नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमधील विधानसभा निवडणुकांसाठी होणाऱ्या मतदानावेळी मतदान केंद्रे ताब्यात घेण्यावरून झालेल्या संघर्षात एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. यामध्ये काहीजण जखमी झाले असून, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. 

देशातील नऊ विधानसभा मतदारसंघ आणि एका लोकसभा मतदारसंघात आज (रविवार) मतदान सुरू आहे. त्यामध्ये राजुरी गार्डन (दिल्ली), लिटिपरा (झारखंड), नंजनगुड (कर्नाटक), ढोलपूर (राजस्थान), कंठी दक्षिण (पश्चिम बंगाल), अतेर आणि बांधवगड (मध्यप्रदेश), भोरंज (हिमाचल प्रदेश) आणि ढेमाली (आसाम) या विधानसभा मतदारसंघांमध्ये निवडणुका होत असून, श्रीनगर येथे लोकसभा निवडणूक होत आहे. 

जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला हे स्वतः ही निवडणूक लढवत आहेत. येथे झालेल्या गोंधळाला सरकार जबाबदार असून, निवडणुका यशस्वीपणे शांततेत पार पाडण्यात सरकार अपयशी ठरले आहे, असे अब्दुल्ला यांनी सांगितले. 

तसेच, दिल्ली महापालिकेच्या महत्त्वपूर्ण निवडणुकीच्या तोंडावरच राजुरी गार्डनची पोटनिवडणूक होत आहे. त्याचा काही प्रमाणात पुढील निवडणुकांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. 
 

Web Title: civilians killed in clashes during voting in srinagar