जेठमलानींकडून बदनामीकारक वक्तव्ये

पीटीआय
शुक्रवार, 19 मे 2017

जर अशा प्रकारची वक्तव्ये प्रतिवादी 1 (अरविंद केजरीवाल) यांच्या सांगण्यावरून आली असतील, तर याचिकाकर्ते (जेटली) यांची फेरतपासणी सुरू ठेवण्यात काहीही अर्थ नाही. यासाठी प्रतिवादी 1 ला न्यायालयामध्ये त्याचे म्हणणे मांडण्यासाठी बोलवण्यात यावे

नवी दिल्ली - केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यातील खटल्याचे गांभीर्य दिवसेंदिवस वाढत आहे. केजरीवाल यांची बाजू मांडताना त्यांचे वकील ज्येष्ठ विधिज्ञ राम जेठमलानी यांनी जेटली बदनामीकारक वक्तव्ये केल्याचे मत न्यायालयाने नोंदविले. दरम्यान याप्रकरणी आता केजरीवाल यांना पुढील सुनावणीसाठी न्यायालयासमोर बोलविण्यात यावे, असे आदेश दिल्ली न्यायालयाचे न्या. मनमोहन यांनी दिले.

याबाबत मत व्यक्त करताना न्या. मनमोहन म्हणाले, जर अशा प्रकारची वक्तव्ये प्रतिवादी 1 (अरविंद केजरीवाल) यांच्या सांगण्यावरून आली असतील, तर याचिकाकर्ते (जेटली) यांची फेरतपासणी सुरू ठेवण्यात काहीही अर्थ नाही. यासाठी प्रतिवादी 1 ला न्यायालयामध्ये त्याचे म्हणणे मांडण्यासाठी बोलवण्यात यावे, असे ते म्हणाले.

याबाबत जेटली यांचे वकील ऍड. राजीव नायर आणि ऍड. संदीप सेठी यांनी केजरीवाल यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल स्पष्टीकरण मागविले. तसेच जेठमलानी यांनी केलेली वक्तव्ये केजरीवाल यांच्या सांगण्यावरून केली होती का, याबाबतही प्रतिवादींनी खुलासा करावा, अशी विनंती न्यायालयाकडे करण्यात आली.

न्या. दीपाली शर्मा यांच्या न्यायालयासमोर बुधवारी जेठमलानी यांची बदनामी करणारी वक्तव्ये केली होती. या वेळी ते जेटली यांची न्यायालयामध्ये फेरतपासणी घेत होते. "डीडीसीए'मधील आर्थिक अनियमिततेबाबत केजरीवाल यांनी जेटलींवर आरोपांच्या फैरी झाडल्या होत्या. यानंतर जेटली यांनी केजरीवाल व त्यांचे आम आदमी पक्षाचे सहकारी यांच्यावर 10 कोटी रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा टाकला होता. केजरीवाल यांच्यासह आप नेते राघव चंद्रा, कुमार विश्‍वास, आशुतोष, संजय सिंह, दीपक वाजपेयी यांच्यावरही आरोप ठेवण्यात आले आहेत.