योगी आदित्यनाथ यांनी दिली पोलिस ठाण्याला भेट

वृत्तसंस्था
गुरुवार, 23 मार्च 2017

उत्तर प्रदेशातील कायदा व सुव्यवस्थेकडे विशेष लक्ष देण्याचा आदित्यनाथ प्रयत्न करत आहेत. त्यांनी गृह खाते आपल्याकडेच ठेवले आहे.

लखनौ - उत्तर प्रदेशचे गृहमंत्रिपद स्वतःकडे ठेवणारे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज (गुरुवार) पोलिस ठाण्याला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. 

लखनौमधील हजरतगंज पोलिस ठाण्याला आज सकाळी योगी आदित्यनाथ यांनी भेट दिली. या भेटीबाबत लखनौचे वरिष्ठ पोलिस अधीक्षकांनाही माहिती नव्हती. सुरवातीला त्यांनी महिला पोलिस ठाण्याला भेट दिली. त्यानंतर हजरतगंज पोलिस ठाण्यात पोहचले. त्यामुळे सर्वांना आश्चर्य वाटले. आदित्यनाथ यांच्यानंतर वरिष्ठ पोलिस अधीक्षक मंजील सैनी याठिकाणी पोहचले. उत्तर प्रदेशचे पोलिस महासंचालक जावेद अहमद हे सुद्धा नंतर याठिकाणी आले.

उत्तर प्रदेशातील कायदा व सुव्यवस्थेकडे विशेष लक्ष देण्याचा आदित्यनाथ प्रयत्न करत आहेत. त्यांनी गृह खाते आपल्याकडेच ठेवले आहे. महिलांची छेड काढणाऱ्यांसाठी त्यांनी बुधवारी अँटी रोमिओ दल स्थापन केले होते.