बीसीसीआयच्या तीन अधिकाऱ्यांना दणका...

पीटीआय
रविवार, 19 फेब्रुवारी 2017

सर्वोच्च न्यायालयाने बंधनकारक केलेल्या सर्व सुधारणा स्वीकारणाऱ्या अधिकाऱ्यांनाच या लिलावासाठी उपस्थित राहता येईल, असे समितीने म्हटले आहे

नवी दिल्ली - भारताचे माजी महालेखापाल (कॅग) विनोद राय यांच्या नेतृत्वाखालील तीन सदस्यीय "क्रिकेट प्रशासन समिती'ने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) तीन उच्चस्तरीय अधिकाऱ्यांस बंगळूर येथे उद्या (सोमवार) होणाऱ्या "भारतीय प्रिमियर लीग' (आयपीएल) साठीच्या लिलावामध्ये उपस्थित राहण्याची परवानगी नाकारली आहे.

""आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलचे सभासद असल्याचा दावा करणाऱ्या सी के खन्ना, अमिताभ चौधरी, अनिरुद्ध चौधरी यांच्यासहित इतर अधिकाऱ्यांना लिलावासाठी उपस्थित राहण्याची परवानगी दिली जाणार नाही. अशा व्यक्तींसंदर्भातील प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट असल्याने ही परवानगी नाकारण्यात आली आहे,'' असे समितीने म्हटले आहे.

खन्ना हे बीसीसीआयचे सर्वांत ज्येष्ठ उपाध्यक्ष आहेत. अनिरुद्ध यांनी यापूर्वी बीसीसीआयच्या खजिनदारपदाची जबाबदारी सांभाळली आहे; तर अमिताभ हे मंडळाचे संयुक्त सचिव म्हणून काम करत होते. क्रिकेट प्रशासन समितीच्या स्थापनेनंतर या तीनही अधिकाऱ्यांकडील सर्व अधिकार काढून घेण्यात आले आहेत.

सर्वोच्च न्यायालयाने बंधनकारक केलेल्या सर्व सुधारणा स्वीकारणाऱ्या अधिकाऱ्यांनाच या लिलावासाठी उपस्थित राहता येईल, असे समितीने म्हटले आहे.

Web Title: CoA bars top BCCI officials from attending IPL auction