सीबीआयचे माजी संचालक सिन्हा यांच्याविरुद्ध गुन्हा 

वृत्तसंस्था
बुधवार, 26 एप्रिल 2017

सिन्हा यांच्याविरोधात आज सीबीआयने भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा दाखल केला. कोळसा खाण वाटप घोटाळ्याची चौकशी करताना पदाचा दुरुपयोग केल्याचा सिन्हा यांच्यावर आरोप आहे. सिन्हा हे 1974च्या तुकडीतील आयपीएस अधिकारी आहेत. ते 2012 ते 2014 या कालावधीत सीबीआयचे संचालक होते.

नवी दिल्ली - केंद्रीय अन्वेषण विभागाचे (सीबीआय) माजी संचालक रणजित सिन्हा यांच्याविरुद्ध आज "सीबीआय'नेच गुन्हा दाखल केला. कोळसा खाण गैरव्यवहाराच्या चौकशीत पदाचा गैरवापर केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. 

सिन्हा यांच्याविरुद्धच्या आरोपाची चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक स्थापन करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. सिन्हा यांच्या चौकशीसाठी सीबीआयचे विशेष संचालक एम. एल. शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली पथक स्थापन करण्यात आले होते. या पथकाने सिन्हा यांच्या अधिकृत निवासस्थानी असलेल्या अभ्यागत नोंदवहीसह इतर कागदपत्रांची तपासणी केली. कोळसा गैरव्यवहारातील अनेक आरोपी नियमितपणे त्यांच्या निवासस्थानी येत असल्याचे नोंदवहीतील तपशिलावरून स्पष्ट झाले. शर्मा समितीने आपल्या तपासाचा अहवाल सर्वोच्च न्यायालयात सादर केला होता. त्या अहवालानुसार सिन्हा यांच्याविरुद्ध सकृतदर्शनी पुरावे असल्याचे मत न्यायालयाने व्यक्त केले होते. 

सिन्हा यांच्याविरोधात आज सीबीआयने भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा दाखल केला. कोळसा खाण वाटप घोटाळ्याची चौकशी करताना पदाचा दुरुपयोग केल्याचा सिन्हा यांच्यावर आरोप आहे. सिन्हा हे 1974च्या तुकडीतील आयपीएस अधिकारी आहेत. ते 2012 ते 2014 या कालावधीत सीबीआयचे संचालक होते. 

दरम्यान, सीबीआयच्या माजी संचालकांविरोधात गुन्हा दाखल होण्याची ही या वर्षातील दुसरी घटना आहे. याआधी फेब्रुवारी महिन्यात सीबीआयचे माजी संचालक ए. पी. सिंह यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. मांस निर्यातदार मोइन कुरेशीला "मनी लॉंडरिंग' प्रकरणात मदत केल्याचा सिंह यांच्यावर आरोप आहे. 

. . . . . .