यादवांमधील शीतयुद्ध कायम

यादवांमधील शीतयुद्ध कायम
यादवांमधील शीतयुद्ध कायम

लखनौ, - उत्तर प्रदेशात यादव कुटुंबीयांमधील शाब्दिक चकमकी काहीशा थंडावल्या असल्या, तरीसुद्धा शीतयुद्धाचे वातावरण अद्याप कायम आहे. समाजवादी पक्षाचे प्रमुख मुलायमसिंह यादव यांनी राज्य सरकारतर्फे दिल्या जाणाऱ्या यश भारती पुरस्कार वितरण सोहळ्याला अचानक दांडी मारल्याने राज्य सरकार तोंडघशी पडले आहे. काही दिवसांपूर्वी या पुरस्काराच्या वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्ध झालेल्या जाहिरातींमध्ये मुलायम यांच्यासोबत अखिलेश यांचेही छायाचित्र प्रसिद्ध करण्यात आले होते. या पुरस्कार वितरण सोहळ्याला मुलायम यांनी उपस्थित राहावे म्हणून खुद्द अखिलेश त्यांच्या घरी गेले होते; पण नेताजींनी पुत्रहट्ट धुडकावून लावला. यानंतर नाराज झालेल्या अखिलेश यांनी थेट लोकभवन गाठले. याच ठिकाणी पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. या कार्यक्रमात भाषण करताना अखिलेश यांनी कोणतीही राजकीय टीकाटिप्पणी केली नाही. समाजवादी पक्षातील अंतर्गत यादवीच्या पार्श्‍वभूमीवर अखिलेश यांच्या उपस्थितीमध्ये पार पडलेला हा पहिलाच कार्यक्रम होता.

आघाडीचे प्रयत्न सुरू
उत्तर प्रदेशच्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर समाजवादी पक्षाने संयुक्त जनता दल आणि राष्ट्रीय लोक दल या दोन पक्षांसोबत आघाडी करण्याचे प्रयत्न चालविले असून, यासाठीच्या चर्चेची सूत्रे प्रदेशाध्यक्ष शिवपाल यादव यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली आहेत. भाजपला सत्तेत येण्यापासून रोखण्यासाठी आम्ही महाआघाडी करणार आहोत, असे शिवपाल यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. नेताजींनी ठेवलेल्या महाआघाडीच्या प्रस्तावावर अन्य नेत्यांनी शिक्कामोर्तब केल्याचे त्यांनी नमूद केले.

पराभवाची भीती
पक्षांतर्गत वादाच्या पार्श्‍वभूमीवर समाजवादी पक्षातील काही ज्येष्ठ नेत्यांना पराभवाची भीती सतावते आहे. राज्यसभा सदस्य बेनीप्रसाद वर्मा यांनी पक्ष जर एकजुटीने निवडणुकीस सामोरा गेला नाही, तर पराभव अटळ असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, अन्य कोणत्याही पक्षाने आपल्याला राज्यसभा सदस्यत्व देण्याचे आमिष दाखविलेले नसल्याचेही त्यांनी नमूद केले. विरोधी पक्षांकडून तसा प्रस्ताव आला तरीसुद्धा आपण तो धुडकावून लावू, असेही त्यांनी सांगितले. काही नेत्यांना पक्ष फुटण्याची भीतीही सतावते आहे.

अखिलेशचा आघाडीस विरोध
मुख्यमंत्री अखिलेश यांनी मात्र आगामी निवडणुकीसाठी आघाडी करण्यास विरोध दर्शविला आहे. भविष्यामध्ये जागावाटपाबाबत जेव्हा चर्चा सुरू होईल, तेव्हा मात्र अखिलेश यात खोडा घालू शकतात. पक्षातील सद्यःस्थिती कमालीची नाजूक असून कोणीच तडजोड करण्याच्या तयारीत नाही, त्यामुळे हा संघर्ष टोकाला जाऊ शकतो, असेही काहींना वाटते. रथयात्रेच्या निमित्ताने मात्र दोन्ही गटांच्या संयमाची खरी कसोटी लागणार आहे.

"दलाल' शब्दामुळे अमरसिंह व्यथित
मुख्यमंत्री अखिलेश यांनी अमरसिंह यांच्यासाठी "दलाल' असा शब्द वापरल्याने ते चांगलेच व्यथित झाले आहेत. एखाद्या बलात्कार केलेल्या गुन्हेगाराप्रमाणे मला वागणूक दिली जात आहे. या सगळ्या घडामोडींमध्ये माझे जर काही बरेवाईट झाले, तर याला रामगोपाल यादव जबाबदार असतील, असे प्रतिपादन अमरसिंह यांनी केले आहे.
अखिलेश यांनी ज्या माणसासाठी "दलाल' असा शब्दप्रयोग केला आहे, तोच माणूस त्यांच्या विवाहाप्रसंगी प्रत्येक कार्यक्रमात सहभागी होता. अखिलेश यांच्या विवाहास त्यांच्या कुटुंबीयांचा विरोध होता, तेव्हा केवळ मीच त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा होतो. मी आज जरी मुख्यमंत्र्यांसोबत नसलो, तरीसुद्धा मुलायमसिंहांच्या मुलास माझा नेहमीच पाठिंबा असेल. मीच त्यांना कधीकाळी ऑस्ट्रेलियामध्ये घेऊन गेलो होतो, असेही अमरसिंह यांनी नमूद केले. रामगोपाल यांच्या धमक्‍यांनी मी घाबरलो असून, मलाही दोन मुली आहेत. हा मनुष्य सत्तेत असताना वेगळा वागतो, सत्तेतून बाहेर पडताच मात्र रंग बदलतो. मलाही त्यांनी धमकी दिली असल्याने सरकारने आपल्याला संरक्षण द्यावे, अशी विनंतीही त्यांनी केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com