न्यायाधीश कर्नन यांना सहा महिन्याच्या तुरुंगवासाची शिक्षा

वृत्तसंस्था
मंगळवार, 9 मे 2017

कोलकाता उच्च न्यायालयाचे न्यायाधीश सी. ए. कर्नन यांना अवमानप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे. पदावर असताना शिक्षा ठोठावण्यात आलेले कर्नन हे पहिलेच न्यायाधीश ठरले आहेत.

नवी दिल्ली : कोलकाता उच्च न्यायालयाचे न्यायाधीश सी. ए. कर्नन यांना अवमानप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे. पदावर असताना शिक्षा ठोठावण्यात आलेले कर्नन हे पहिलेच न्यायाधीश ठरले आहेत.

सर्वोच्च न्यायालयाच्या विशेष घटनापीठाने आज (मंगळवार) कर्नन यांना शिक्षा सुनावली. यापूर्वी कर्नन यांनी 20 न्यायाधी "भ्रष्ट न्यायाधीश' असल्याचे म्हणत या न्यायाधीशांची चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली होती. यासंदर्भात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही पत्र लिहिले होते. शिवाय दलित असल्याने आपल्यावर अन्याय करण्यात येत असल्याचा आरोपही त्यांनी केला होता. मागील आठवड्यात सर्वोच्च न्यायालयाने कर्नन यांची मानसिक अवस्था तपासण्यासाठी त्यांची वैद्यकीय चाचणी करण्याचे आदेश दिले होते. मात्र पोलिसांना घेऊन तपासणीसाठी आलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना कर्नन यांनी तपासणी करण्यास नकार दिला होता.

या प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश जे. एस. खेहर यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने कर्नन यांना सहा महिन्याची शिक्षा सुनावली आहे. तसेच कर्नन यांचे विधान किंवा त्यांनी काढलेले "आदेश' प्रसिद्ध करण्यास प्रसारमाध्यमांनाही बंदी केली आहे. कोलकाता पोलिसांनी कर्नन यांना ताब्यात घ्यावे, असे आदेशही न्यायालयाने दिले आहेत.