नितीशकुमारांचे वक्तव्य राष्ट्रपती निवडणुकीपुरते

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 4 जुलै 2017

झाले ते झाले; परंतु कॉंग्रेस- जेडीयू संबंधांवर आणि राज्य सरकारच्या स्थैर्यावर कोणताही विपरीत परिणाम होणार नाही. आघाडी मजबूत आहे, अशीही सारवासारव सिंघवी यांनी केली

नवी दिल्ली - विरोधकांचे ऐक्‍य खिळखिळे करण्यासाठी कॉंग्रेसला जबाबदार धरणारे बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यासमोर कॉंग्रेसने नांगी टाकली आहे.

नितीशकुमार यांचे वक्तव्य केवळ राष्ट्रपती निवडणुकीपुरतेच मर्यादित असून, त्याचा कॉंग्रेस आणि संयुक्त जनता दलाच्या संबंधांवर परिणाम होणार नाही, असा नरमाईचा सूर कॉंग्रेसने आज लावला.

नितीशकुमार यांच्या वक्तव्याच्या पार्श्‍वभूमीवर कॉंग्रेसचे प्रवक्ते अभिषेक सिंघवी म्हणाले, की नितीशकुमार यांनी केलेले विधान फक्त राष्ट्रपती निवडणुकीशी निगडित आहे. त्यापलीकडे याचा अर्थ लावण्याची गरज नाही. खुद्द कॉंग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधींनीही पाठिंब्याबाबतचा निर्णय (कोविंद यांना जेडीयूने दिलेला पाठिंबा) हा त्या पक्षाचा स्वतंत्र निर्णय असून, त्याचा राज्यातील आघाडीवर काहीही परिणाम होणार नाही, असे स्पष्ट केले होते, याकडे सिंघवी यांनी लक्ष वेधले. झाले ते झाले; परंतु कॉंग्रेस- जेडीयू संबंधांवर आणि राज्य सरकारच्या स्थैर्यावर कोणताही विपरीत परिणाम होणार नाही. आघाडी मजबूत आहे, अशीही सारवासारव सिंघवी यांनी केली.

बिहारमध्ये नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखाली सरकारमध्ये राष्ट्रीय जनता दल आणि कॉंग्रेस सत्तेमध्ये भागीदार आहेत. मात्र, नितीशकुमार यांनी कॉंग्रेसवर उघडउघड हल्ला चढविताना विरोधकांमध्ये फाटाफूट कॉंग्रेसमुळे झाल्याचा आरोप केला. तसेच, उमेदवार ठरविण्यासाठी कॉंग्रेसने संयुक्त जनता दलाला विश्‍वासात घेतले नसल्याचीही त्यांनी तोफ डागली. यामुळे कॉंग्रेसला नरमाईची भूमिका घ्यावी लागली आहे.