गोव्यात कॉंग्रेसचे खिचडी सरकार?

गोव्यात कॉंग्रेसचे खिचडी सरकार?

भाजप आणि कॉंग्रेसमध्ये अटीतटीची लढत झाली. भाजप सरकार विरोधात असलेल्या नाराजीमुळे अनेक, मंत्री आणि आमदारांना पराभूत व्हावे लागले. तरीसुध्दा काही ठिकाणी सत्ताधारी पक्षाविरोधातील नाराजीचा लाभ कॉंग्रेस उटवू शकली असती. भाजप आणि मगो पक्ष यांच्यात युती झाली असती तर मात्र चित्र निश्‍चितच वेगळे दिसले असते.

भाजपचा मित्रपक्ष मगोने ऐन निवडणुकीच्या तोंडावर युती तोडली तसेच प्राथमिक शिक्षणाच्या भाषामाध्यमाचा प्रश्‍नी भाजपने विश्‍वासघात केल्याचा आरोप करून राज्य संघ प्रमुख सुभाष वेलिंगकर यांनी वेगळा गट स्थापन केला. यामुळे भाजपचा अंग असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघात दोन गट पडले याचा परिणामही भाजपच्या निकालावर झालेला दिसून येतो.

मगो, गोवा सुरक्षा मंच आणि शिवसेना यांची युती झाली तरीही गोसुमं आणि शिवसेनेला एकही जागा मिळवता आली नाही. या दोन्ही पक्षांचे उमेदवार कोठेही स्पर्धेत असल्याचे जाणवले नाही. गोवा विकास पक्ष, गोवा सुराज पक्ष यांनाही गोमंतकीयांनी नाकारले. मोठा गाजावाजा करून गोव्यात सत्ता मिळवणार असे जाहीर करत रिंगणात उतरलेल्या आम आदमी पक्षालाही भोपळासुध्दा फोडता आला नाही. "आप'चे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार एल्विस गोम्सही चौथ्या क्रमांकावर फेकले गेले. तीन ठिकाणी मात्र अपक्षांनी बाजी मारली. त्यात प्रियोळ मतदारसंघातून लढणारे गोविंद गावडे यांना भाजपने समर्थन दिले होते तर पर्वरी मतदारसंघातून लढणारे रोहन खंवटे यांना कॉंग्रेसचा पाठिंबा होता. गोव्याच्या इतिहासात आजवर अपक्ष आमदार पुन्हा निवडून आला नव्हता, परंतु खंवटे यांनी हा पराक्रम केला आहे. 

चाळीस सदस्यांच्या विधानसभेत कॉंग्रेस पक्षाला 17 जागा, भाजपला 13, मगो पक्षाला 3, गोवा फॉरवर्ड पक्षाला 3, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला 1 आणि 3 अपक्ष निवडून आले आहेत. कॉंग्रेस पक्षाला एका अपक्षाचा तर भाजपलाही एका अपक्षाचा पाठिंबा आहे. यामुळे बहुमतासाठीचा आकडा पार करण्यासाठी कॉंग्रेस आणि भाजपलाही अन्य पक्षांची मदत घ्यावी लागणार आहे. गोवा फॉरवर्डचा कल पाहता हा पक्ष कॉंग्रेसला साथ देईल असे वाटत नाही. या पक्षाचे प्रणेते विजय सरदेसाई यांच्या विरोधात कॉंग्रेस पक्षाने उमेदवार उभा केल्याने कॉंग्रेस आणि गोवा फॉरवर्ड यांच्यात होऊ घातलेली युती फिसकटली होती. त्यामुळे कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष लुईझिन फालेरो यांच्या विरोधात एडविन कार्दोज (सिप्रू) यांना गोवा फॉरवर्डने पाठिंबा दिल्याने या दोन्ही पक्षात सुरू झालेले शाब्दिक युध्द निकालानंतरही संपलेले नाही. त्यामुळे कॉंग्रेससमोर अडचण निर्माण झाली आहे. मगो पक्ष हा भाजपचा नैसर्गिक मित्र. परंतु निवडणुकीवेळी त्यांच्यात वितुष्ट आले. त्यामुळे संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी मगो पक्षाला कदापिही सरकारमध्ये घेणार नाही असे जाहीर केले होते. निवडणुकीनंतरही आपल्याला मगो पक्षाची गरज भासणार नाही, असे ते ठामपणे सांगत होते. परंतु निकालानंतर अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की भाजपला सरकार बनवायचे असल्यास मगो, अपक्ष आणि गोवा फॉरवर्ड पक्षाला सोबत घ्यावे लागेल. मनोहर पर्रीकर यांनी ठरवले तर त्यांच्यासाठी हे अशक्‍य नाही. 


कॉंग्रेस पक्ष सर्वाधिक जागा मिळवणारा पक्ष ठरला असला तरी नेतृत्वावरून या पक्षात स्पर्धा आहे. तसेच काही ज्येष्ठ नेत्यांबाबत मगो, गोवा फॉरवर्ड तसेच अपक्षांचाही आक्षेप आहे. त्यामुळे कॉंग्रेसने जरी सरकार बनवायचे ठरवले तरी पाठिंबा कोणी मिळवायचा यावरही एकमत होणे कठीण आहे. तरीसुध्दा प्रतापसिंह राणे हे अकराव्यांदा निवडून आले आहेत. तसेच त्यांना मुख्यमंत्रिपदाचा गाढा अनुभव आहे. त्यामुळे त्यांच्याकडे धुरा सोपवायचे झाल्यास कदाचित मगो पक्ष आणि गोवा फॉरवर्डही समर्थन देऊ शकेल. तरीसुध्दा भाजपएवढे स्थिर सरकार कॉंग्रेस देऊ शकेल काय, हा प्रश्‍नच आहे. 


विधानसभेतील त्रिशंकू परिस्थिती गोव्याला नवी नाही. अगदी एक दिवसांतही येथे मुख्यमंत्री बदललेला आहे. सहा दिवसांचा मुख्यमंत्रीदेखील गोव्याने पाहिला आहेत. एका पक्षाला बहुमत न मिळाल्याने पाचवेळा राष्ट्रपती राजवटदेखील लागू झाली आहे. आता कोणाही एका पक्षाला बहुमत मिळाले नसल्याने घोडेबाजाराला ऊत येणार आहे. यात कोणाचे घोडे गंगेत न्हाते ते पाहावे लागणार आहे. भाजपचे दक्षिण गोव्याचे खासदार ऍड. नरेंद्र सावईकर यांनी गोवा 2019 साली नव्या निवडणुकीला सामोरे जाणार काय, असा जो प्रश्‍न केला आहे तो फारच बोलका आहे. यावरून भाजप बहुमतापासून दूर असल्याने विरोधात बसणे पसंत करील, असे वाटते. त्यामुळे कॉंग्रेसचे खिचडी सरकार आले तर ते अस्थिर असेल आणि ते फार काळ टिकणार नाही. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com