काँग्रेस कर्नाटकचा बदला घेणार गोव्यात...

congress
congress

पणजी (गोवा): कर्नाटकचा बदला गोव्यात घेण्यासाठी काँग्रेसने रणनीती आखली असून, गोव्यातील सर्वात मोठा पक्ष म्हणून काँग्रेस सत्ता स्थापनेचा दावा करणार आहे. जो न्याय कर्नाटकला लावला तोच गोव्यात लावण्याची मागणी काँग्रेस करणार आहे. गोव्यातील काँग्रेसचे प्रभारी चेल्ला कुमार आज (शुक्रवार) गोव्याला दाखल होणार असून ते आणि पक्षाचे इतर नेते राज्यपालांची भेट घेणार आहेत.

गोव्यातील सर्वात मोठा पक्ष म्हणून काँग्रेसला सत्ता स्थापनेसाठी आमंत्रण द्यावं, अशी मागणी काँग्रेस करणार आहे. गरज पडल्यास राजभवनात काँग्रेस आपल्या सर्व आमदारांना हजर करणार आहे, अशी माहिती पक्षाचे नेते यातिश नाईक यांनी दिली.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत 104 जागांसह भाजप मोठा पक्ष ठरला. परंतु बहुमत मिळवता आले नाही. मात्र, मोठा पक्ष म्हणून भाजपने सत्ता स्थापनेचा दावा केला आहे. त्यानंतर राज्यपाल वजुभाई वाला यांनीही भाजपला सत्ता स्थापनेसाठी आमंत्रित केले आहे.. येत्या 15 दिवसात बहुमत सिद्ध करा, असेही राज्यपालांनी सांगितले. बी. एस. येडियुरप्पा यांनी आज मुख्यमंत्रीपदाची शपथही घेतली.

दरम्यान, दुसरीकडे 2017च्या गोवा विधानसभा निवडणुकीत काँग्रेस 17 जागांसह मोठा पक्ष ठरुनही 13 जागा मिळवलेल्या भाजपने राज्यात सत्ता स्थापन केली होती. त्यामुळे कर्नाटकचा न्याय गोव्यातही लागू करावा, अशी मागणी करत मोठा पक्ष म्हणून सत्ता स्थापनेचा दावा काँग्रेसने केला आहे.

गोवा विधानसभा 40 सदस्यांची आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत 40 पैकी काँग्रेसला सर्वाधिक जागा म्हणजे 17 जागा मिळाल्या होत्या. त्यापाठोपाठ, भाजपला 13, महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाला 3, गोवा फॉरवर्ड पार्टीला 3 जागा मिळाल्या होत्या. तर अपक्षांना 3 तर राष्ट्रवादीला एक जागा मिळाली होती. महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष, गोवा फॉरवर्ड पार्टी व अपक्षांनी भाजपला पाठिंबा दिला. त्यात, विश्वजित राणे यांनी आमदारकीची शपथ घेतल्यानंतर, काँग्रेसच्या आमदारकीचा राजीनामा दिला आणि भाजपात दाखल होऊन पुन्हा निवडणूक लढवून भाजपचे आमदार झाले. त्यामुळे भाजप आणि समर्थकांची एकूण संख्या 21 वर पोहोचली. तोच बहुमताचा आकडा होता. निवडणुकीआधी कोणत्याही पक्षाशी युती नसताना आणि निकालानंतर काँग्रेस मोठा पक्ष असतानाही, भाजपने लहान पक्षांना एकत्र करत, बहुमताचा आकडा पार करुन सरकार स्थापन करण्याचा दावा केला. गोव्यात मनोहर पर्रिकर यांच्या नेतृत्त्वात सरकार स्थापन झाल आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार गोवा विधानसभेत मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांना बहुमत सिद्ध करायचे होते. त्यामुळे गोवा विधानसभेतही पर्रिकर सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकला.

कर्नाटक विधानसभा निवडणूकीनंतर भाजपने सर्वांत मोठा पक्ष म्हणून सत्ता स्थापनेचा दावा करून बी. एस. येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. या नियमावर बोट ठेवून काँग्रेस गोव्यात सत्ता स्थापनेचा दावा करणार आहे. गोव्यामध्ये आता काय घडामोडी घडणार याकडे देशाचे लक्ष लागले आहे.

गोवा निकालः

  • भाजप - 13
  • काँग्रेस - 17 (विश्वजीत राणे काँग्रेसमधून भाजपमध्ये गेल्यामुळे काँग्रेसचं संख्याबळ 17 वरुन 16वर)
  • राष्ट्रवादी काँग्रेस -1
  • महाराष्ट्रवादी गोमंतक - 3
  • गोवा फॉरवर्ड पार्टी - 3
  • अपक्ष/इतर - 3

कर्नाटक विधानसभा निवडणूक निकाल 2018

  • भाजप - 104
  • काँग्रेस - 78
  • जनता दल (सेक्युलर) - 37
  • बहुजन समाज पार्टी - 1
  • कर्नाटक प्रज्ञावंत जनता पार्टी - 1
  • अपक्ष - 1

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com