"भारतव्याप्त काश्‍मीर': कॉंग्रेसकडून काश्‍मीरचा उल्लेख...

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 4 जून 2017

या पुस्तिकेच्या 12 व्या पृष्ठावर काश्‍मीरचा चुकीचा नकाशा छापण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे. कॉंग्रेस या प्रकरणी पक्षाकडून सारवासारव करण्यात येऊन ही "प्रिंटिंग मिसटेक' असल्याचा दावा करण्यात आला आहे

लखनौ - भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) सरकारला लक्ष्य करणाऱ्या कॉंग्रेस पक्षाच्या 15 पानी पुस्तिकेमध्ये जम्मु काश्‍मीर या राज्याचा उल्लेख चक्क "भारतव्याप्त (इंडियन ऑक्‍युपाईड) काश्‍मीर' असा करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.

"आंच' असे या पुस्तिकेचे नाव असून यामध्ये केंद्र सरकारच्या तीन वर्षांतील "अपयशी' कामगिरीबद्दल कॉंग्रेसकडून सरकारवर टीका करण्यात आली आहे. कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद व राज बब्बर यांच्या हस्ते उत्तर प्रदेशमध्ये या पुस्तिकेचे उद्‌घाटन करण्यात आले होते. या पुस्तिकेच्या 12 व्या पृष्ठावर काश्‍मीरचा चुकीचा नकाशा छापण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे.

दरम्यान, भाजपने या नकाशासंदर्भात संताप व्यक्त करत कॉंग्रेस पक्षाने माफी मागावी, अशी मागणी केली आहे. मात्र कॉंग्रेस पक्षाकडून सारवसारव करण्यात येऊन ही "प्रिंटिंग मिसटेक' असल्याचा दावा करण्यात आला आहे.