पाकला रोखण्यासाठी राष्ट्रसंघाने लक्ष द्यावे

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 19 मे 2017

माजी कायदामंत्री कपिल सिब्बल यांनी आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या निकालाचे स्वागत करताना म्हटले आहे, की पाकिस्तान हे गुंडप्रवृत्तीचे राष्ट्र आहे. आता पाकिस्तानने हा निकाल मान्य करावा. या प्रकरणात जाधव कुटुंबीयांना आपली व्यक्तिगत मदत हवी असल्यास आपण तयार आहोत, असेही सिब्बल यांनी म्हटले आहे

नवी दिल्ली - आंतरराष्ट्रीय न्यायालयाने कुलभूषण जाधव यांच्या प्रकरणी दिलेल्या निकालाचे कॉंग्रेसने स्वागत केले आहे. तसेच, हा निकाल अमान्य करणाऱ्या पाकिस्तानने अडथळे आणू नयेत, यासाठी आता संयुक्त राष्ट्र संघाने लक्ष द्यावे, असेही आवाहन कॉंग्रेसने केले आहे. माजी कायदामंत्री कपिल सिब्बल यांनी कुलभूषण जाधव यांच्या कुटुंबीयांना कायदेशीर मदतीची तयारी दर्शविली आहे.

आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या निकालावर प्रतिक्रिया देताना कॉंग्रेसचे वरिष्ठ नेते आनंद शर्मा यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले, की जाधव प्रकरणामुळे आंतरराष्ट्रीय न्यायालयात जाण्याचा दरवाजा उघडला आहे; परंतु हा असा विषय होता, ज्यात पाकिस्तानची मानसिकता लक्षात घेता त्याविरुद्ध आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये दाद मागण्याखेरीज भारताकडे दुसरा पर्याय नव्हता. पाकिस्तानने एकतर्फी लष्करी न्यायालयात कुलभूषण जाधव यांना मृत्युदंडाची शिक्षा ठोठावली आणि त्यांना कोणतीही न्यायोचित कायदेशीर मदत मिळू दिली नाही. त्यामुळे भारताला नाइलाजास्तव आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव घ्यावी लागली.

माजी कायदामंत्री कपिल सिब्बल यांनी आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या निकालाचे स्वागत करताना म्हटले आहे, की पाकिस्तान हे गुंडप्रवृत्तीचे राष्ट्र आहे. आता पाकिस्तानने हा निकाल मान्य करावा. या प्रकरणात जाधव कुटुंबीयांना आपली व्यक्तिगत मदत हवी असल्यास आपण तयार आहोत, असेही सिब्बल यांनी म्हटले आहे.