संघविचारांचा काँग्रेस पराभव करेल

संघविचारांचा कॉंग्रेस पराभव करेल
संघविचारांचा कॉंग्रेस पराभव करेल

नवी दिल्ली - "सितारोंसे आगे जहॉं और भी है, अभी इश्‍कके इम्तिहां और भी है' या कवी इक्‍बाल यांच्या ओळींचा आधार घेत राहुल गांधींनी आज कॉंग्रेस कार्यकर्त्यांना खडतर आव्हानांची जाणीव करून दिली. निमित्त होते कॉंग्रेसच्या 132व्या स्थापना दिनाचे. पक्ष मुख्यालयात झालेल्या स्थापना दिन सोहळ्यात सोनिया गांधींच्या अनुपस्थितीत ध्वजवंदन आणि पक्षाला भाषण करून कॉंग्रेसच्या सर्वोच्च नेतृत्वाच्या दिशेने आज आणखी एक पाऊल पुढे टाकले. संघाच्या विचारांचा कॉंग्रेस पराभव करेल, असा विश्‍वास त्यांनी या वेळी व्यक्त केला.

"24 अकबर मार्ग' या पक्ष मुख्यालयामध्ये कॉंग्रेसचा वर्धापन दिनाचा सोहळा आज झाला. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग, ए. के. अँटनी, मोतीलाल व्होरा, जनार्दन द्विवेदी, मोहसीना किडवई, अशोक गेहलोत, मल्लिकार्जुन खर्गे आदी अनेक वरिष्ठ नेते, सरचिटणीस, पदाधिकारी, कॉंग्रेस सेवादल, महिला कॉंग्रेस, युवक कॉंग्रेस यांसारख्या संलग्न संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते. यंदा प्रथमच, राहुल गांधींच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. कॉंग्रेसच्या स्थापनादिनी अध्यक्षांच्याच हस्ते ध्वजवंदनाची परंपरा आहे. मागील वर्षी सोनिया गांधी परदेश दौऱ्यावर असताना खजिनदार मोतीलाल व्होरा यांच्या हस्ते ध्वजवंदन झाल्याचा अपवाद आहे. मात्र अध्यक्षस्थानी नसलेल्या व्यक्तीकडून ध्वजवंदनाबरोबरच पक्षाला दिग्दर्शन केले जाण्याचा प्रकार आज कॉंग्रेसध्ये पहिल्यांदाच घडला. वर्धापन दिनाच्या निमित्ताने कार्यकर्त्यांना उद्देशून संबोधनाची नवी प्रथा कॉंग्रेसमध्ये आजपासून सुरू झाली.
राहुल गांधींनी या वेळी कॉंग्रेसच्या समावेशक वारशाची आठवण करून देताना मोदी आणि संघाच्या विचारांचा कॉंग्रेस पराभव करेल, असा विश्‍वास व्यक्त केला. राहुल गांधी म्हणाले, की कॉंग्रेसचा इतिहास विचार, आंदोलनांचा इतिहास आहे. भारतीय जनतेशी कॉंग्रेसचे नाते सहवेदनेचे आहे. कॉंग्रेसची विचारसणी मतभेदांचाही आदर करणारी आहे. छळ करणाऱ्यांना कॉंग्रेस कधीच घाबरली नाही. आज मोदी सरकार देशाची सामाजिक वीण उसवायला निघाले आहेत. नोटबंदीचा निर्णय हा त्यातलाच प्रकार आहे. यातून मोदींनी देशाच्या आर्थिक स्वातंत्र्यावर हल्ला चढवला आहे. मोदींना भ्रष्टाचाराविरुद्ध लढायचे आहे; पण सहारा आणि बिर्ला प्रकरणात त्यांच्यावर होणाऱ्या आरोपांचे उत्तर देण्याची त्यांची तयारी नाही, असाही चिमटा राहुल गांधींनी या वेळी काढला.

नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारसरणी समाजात तेढ निर्माण करणारी आहे. कॉंग्रेस पक्ष या विचारांचा पराभव करेल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com