'काळी जादू' करत असल्याच्या संशयावरून दांपत्याला जिवंत जाळले!

वृत्तसंस्था
शनिवार, 8 एप्रिल 2017

"आम्ही ही कॉलनी कायमची सोडून जातो', असे सांगत आई-वडिलांना सोडण्याची याचना मुलांनी केली. मात्र, जमावाने त्यांचे काहीही न ऐकता सलग अर्धा तास दोघांना मारहाण केली. त्यानंतर दोघांना एका वीजेच्या खांबाला बांधले आणि पेटवून दिले.

हैदराबाद (तेलंगणा) - काळी जादू करत असल्याचा आरोप करत पंधरा जणांच्या जमावाने पन्नाशीतील दांपत्याला त्यांच्या मुलांसमोर मारहाण करत, जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

सिद्दीपेठ जिल्ह्यातील दुब्बक गावातील पंधरा जणांच्या जमावाने कादावेरगू सुदर्शन आणि त्यांच्या पत्नी राजेश्‍वरी यांच्यावर काळी जादू करत असल्याचा आरोप करत मारहाण केली. यावेळी आजूबाजूला मोठा जमाव होता. विशेष म्हणजे या दांपत्याची 21 वर्षांची विवाहित मुलगी रेणुका आणि श्रीधर नावाचा किशोरवयीन मुलगा तेथे उपस्थित होता. या दोघांनी जमावाला थांबविण्याचा प्रयत्न केला, मात्र जमावाने त्यांनाही मारहाण केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या अनेक दशकांपासून सुदर्शन यांचे कुटुंबिय बी.सी. कॉलनीमध्ये निवास करत होते. नातेवाईकांनी आणि शेजाऱ्यांनीच आमच्याविरुद्ध काळी जादू करत असल्याच्या संशयावरून दांपत्याला लक्ष्य केले.

"आम्ही ही कॉलनी कायमची सोडून जातो', असे सांगत आई-वडिलांना सोडण्याची याचना मुलांनी केली. मात्र, जमावाने त्यांचे काहीही न ऐकता सलग अर्धा तास दोघांना मारहाण केली. त्यानंतर दोघांना एका वीजेच्या खांबाला बांधले आणि पेटवून दिले. दरम्यान पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी हे दांपत्य पेटलेल्या अवस्थेत होते आणि त्यांची मुले लाकडाच्या मदतीने आग विझवण्याचा प्रयत्न करत होते. पोलिस आल्याचे समजल्याने कॉलनीतील सर्वजण घरात जाऊन दार लावून बसले.

दांपत्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. त्यानंतर उपचारासाठी हैदराबादला हलविण्यात आले. मात्र तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. पोलिसांनी या प्रकरणी तीन महिलांसह एकूण 15 जणांना ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.

Web Title: couple burnet alive for performing 'black magic' in Telangana