β 'त्या' नराधमांना काय व्हावी शिक्षा?

संतोष धायबर santosh.dhaybar@esakal.com
गुरुवार, 13 ऑक्टोबर 2016

सर्वाधिक बलात्कार होणारे देश-
1) अमेरिका 2) दक्षिण अफ्रिका 3) स्विडन 4) भारत 5) इंग्लंड 6) जर्मनी 7) फ्रान्स 8) कॅनडा 9) श्रीलंका 10) इथिओपिया

राजधानीत सन 2012 मध्ये धावत्या बसमध्ये ‘निर्भया‘वर झालेल्या बलात्कारानंतर देश हादरून निघाला अन् संपूर्ण जगाचे लक्ष वेधले गेले. आरोपींवर गुन्हे दाखल होऊन आज ते शिक्षा भोगत असले तरी देशभर दररोज कोठे ना कोठे बलात्काराच्या घटना घडत आहे. अगदी आकडेवारीतच सांगायचं, तर भारतात 2015 मध्ये बलात्काराची 34, 771 प्रकरणे घडली. म्हणजे दिवसाला सुमारे 95 बलात्कार होतात. म्हणजे तासाला 4 किंवा दर पंधरा मिनिटांनी देशात कुठे ना कुठे बलात्कार घडतो. चिमुकलीपासून ते अगदी 100 वर्षांच्या वृद्ध महिलांची यामधून सुटका होत नाही. बलात्कार थांबविण्यासाठी काय करायला हवे? ‘त्या‘ नराधामांना काय शिक्षा करायला हवी, हा अवघ्या समाजासमोरचा प्रश्न आहे. 

नगर जिल्ह्यातील कोपर्डी येथे विद्यार्थीनीवर झालेला बलात्कार अन् हत्येचे पडसाद संपूर्ण राज्यात उमटले. या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा होण्यासाठी राज्यभरात मूक मोर्चे निघत आहेत. राज्यात ठिकठिकाणी मोर्चे निघत असतानाही बलात्कार थांबलेले नाहीत. नगर जिल्ह्यातच पुन्हा गेल्या महिन्यात पंधरा वर्षांच्या अपंग, मूकबधिर मुलीवर गावातीलच एकाने बलात्कार केला. नाशिक जिल्ह्यातील तळेगाव-अंजनेरी येथील पाच वर्षांच्या चिमुरडीवर सोळा वर्षे वयाच्या मुलाने दोन दिवसांपूर्वी अत्याचार केल्याचे समजले अन् नागरिकांच्या भावनांचा बांध सुटला. 

बलात्काराची घटना दररोज कोठे ना कोठे घडताना दिसत आहे. आता या घटनांनंतर रास्ता रोको होतो अन् जाळपोळही होते. टीव्ही चॅनेलच्या माध्यमातून विविध क्षेत्रातील तज्ञ आपले मत व्यक्त करायला पुढे येतात. विविध दैनिकांमध्ये कॉलमच्या कॉलम बातम्याही छापून येतात. प्रकरण जोपर्यंत ‘गरम‘ आहे तोपर्यंत अनेकजण पीडितेची, कुटुंबाची भेट घेण्यासाठी धावपळ करतात. मदतीचे आश्वासन देतात अन् त्याची बातमीही ‘छापून‘ आणतात. पुढे गुन्हे दाखल होऊन प्रकरण न्यायालयाकडे जाते. विषय थांबतो. पीडीतेला मदतीचे आश्वासन देणारे मात्र पुढे कोठे जातात हा एक न सुटलेला प्रश्न. असो.

एक उदाहरण देतो. राजकीय वलय असलेल्या एकाने युवतीला विवाहाचे आमिष दाखविले. शारिरीक संबंध ठेवले. विवाह मात्र दुसऱयाच मुलीशी केला. त्या युवकावर बलात्काराचा गु्न्हा दाखल झाला. मग तो जामीनावर सुटलादेखील. मात्र, पहिल्या युवतीचे काय? न्याय कधी मिळेल? किती वर्षे लागतील? पुढे काय करायचे? कशाचेच उत्तर तिच्याकडे नाही. कारण...तिच्याकडे ना राजकीय वलय ना पैसा...ही झाली एक बाजू. प्रेम-प्रकरणातून अनेक वर्षे दोघांकडूनही शारिरीक संबंध ठेवले जातात. पुढे खटके उडले की बलात्काराचा गुन्हा दाखल होतो, ही झाली दुसऱी बाजू. कळी उमलण्याआधीच तिच्यावर सामूहिक बलात्कार करून हत्या केली जाते, ही झाली तिसरी बाजू. बलात्काराची कोणतीही बाजू असो, नराधमांना कडक शिक्षा व्हायलाच हवी. कारण, हा फक्त शारीरिक अत्याचार नसतो; मानवी मन मुळापासून उखडून काढण्याचा प्रकार असतो. 

भारतातच नव्हे; जगातील विविध देशांमध्ये बलात्कार घडत आहेत. पहिल्या दहामध्ये भारताचा चौथा क्रमांक आहे, हा आकडा नक्कीच कौतुकास्पद नाही. 
सर्वाधिक बलात्कार होणारे देश-
1) अमेरिका 2) दक्षिण अफ्रिका 3) स्विडन 4) भारत 5) इंग्लंड 6) जर्मनी 7) फ्रान्स 8) कॅनडा 9) श्रीलंका 10) इथिओपिया

बलात्काराचे प्रमाण कमी असणारे देश-
1) स्वित्झर्लंड 2) सिंगापूर 3) आईसलंड 4) जपान 5) लक्झेंबर्ग

प्रत्येक देशाची आरोपीला शिक्षा देण्याची वेगवेगळी पद्धत आहे. कठोर शिक्षा देणाऱया देशांमध्ये बलात्काराचे प्रमाण नक्कीच कमी झाले आहे, यामुळे ते ‘टॉप टेन‘ मध्ये दिसत नाहीत. जागतिक स्तरावर भारत देशाची ओळख बलात्कारी देश म्हणून होऊ लागली आहे. ही ओळख पुसायची असेल तर शिक्षेत बदल करायची गरज वाटते का? भारतात बलात्काराचे प्रमाण कमी होण्यासाठी अन् बलात्कार करणाऱया नराधामांना अद्दल घडविण्यासाठी कठोरात कठोर काय शिक्षा व्हायला हवी? प्रतिक्रियांच्या माध्यमातून जरूर आपले मत व्यक्त कराः