मंत्रालयाच्या दारातच खासदाराला अडवाअडवी !

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 18 मे 2017

खाद्या खासदाराला मंत्र्यांच्या भेटीची वेळ मिळाली की नाही, हे सुरक्षा यंत्रणेला सांगणार कोण? राजा यांच्याकडे प्रथम सुरक्षा अधिकाऱ्यांनी लक्षच दिले नाही, त्यांनी आत जाण्याचा प्रयत्न करताच त्यांना अतिशय अपमानास्पदरीत्या थांबवण्यात आले. त्यावरही राजा यांनी शांतपणे खिशातील संसद सदस्यत्वाचे ओळखपत्र त्यांना दाखविले, तरीही ते त्यांना सोडेनात

नवी दिल्ली - साध्या वेशात, भर उन्हात व चक्क चालत चालत एखाद्या मंत्रालयात मंत्र्यांना भेटायला जाणारे "सन्माननीय लोकप्रतिनिधी' आजच्या काळात असूच शकत नाहीत हा केवळ सामान्यांचाच नव्हे, तर मंत्रालयांच्या द्वारांवरील सुरक्षा यंत्रणेचाही दृढ समज असल्याचे आज शास्त्री भवनात पुन्हा सिद्ध झाले. आज एका वरिष्ठ खासदाराने ओळखपत्र दाखवूनही त्यांना मंत्रालयात सोडण्यास संबंधितांनी प्रारंभी मज्जाव केला. केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर हे या मंत्र्यांचे, तर डी. राजा हे या खासदारांचे नाव. स्वतः राजा यांनीच पत्रकारांना ही माहिती दिली.

मंत्रालयाच्या दारांवर जेथे प्रत्यक्ष खासदारांची ही अवस्था आहे, तेथे सामान्यांचा तर प्रश्‍नच येत नाही. या प्रकारानंतर राजा यांनी, "केवळ खादीचा, कडक इस्त्रीचा कुर्ता- पायजमा घालून आलिशान गाडीतून उतरतो तोच राजकीय नेता नसतो हे लक्षात घ्या,' असे संबंधितांना सुनावले. विशेष म्हणजे मंत्री जावडेकर व खासदार राजा हे दोघेही एकाच म्हणजे वरिष्ठ सभागृहाचेच वर्षानुवर्षे सदस्य आहेत. एक पक्ष, एकच सदस्य व प्रत्येक विषयावर अभ्यासपूर्ण मांडणी अशी राजा यांची राज्यसभेतील ओळख आहे. शास्त्री भवनात किमान 10-15 मंत्री- राज्यमंत्री कार्यालये आहेत. कोणाही अभ्यागताची सबंधित मंत्र्यांशी भेटीची वेळ ठरली, की तसा निरोप तळमजल्यावरील सुरक्षा यंत्रणेकडे जातो. मात्र येथील क्रमांक तीनच्या दरवाजावर दुपारी तीनच्या टळटळीत उन्हात डी. राजा यांची जी अडवाअडवी झाली, त्यातून जावडेकर यांच्या मंत्रालयातील संबंधित बाबू व त्याच ठिकाणची सुरक्षा यंत्रणा यांच्यातील "कम्युनिकेशन गॅप' ही ठळकपणे समोर आली.

स्वतः जावडेकर यांनी, खासदार - लोकप्रतिनिधींना कायम दरवाजे खुले राहतील अशी भूमिका ठेवली आहे. मात्र, एखाद्या खासदाराला मंत्र्यांच्या भेटीची वेळ मिळाली की नाही, हे सुरक्षा यंत्रणेला सांगणार कोण? राजा यांच्याकडे प्रथम सुरक्षा अधिकाऱ्यांनी लक्षच दिले नाही, त्यांनी आत जाण्याचा प्रयत्न करताच त्यांना अतिशय अपमानास्पदरीत्या थांबवण्यात आले. त्यावरही राजा यांनी शांतपणे खिशातील संसद सदस्यत्वाचे ओळखपत्र त्यांना दाखविले, तरीही ते त्यांना सोडेनात. मंत्र्यांच्या कार्यालयातून तुमच्या भेटीची काहीही माहिती कळविण्यात आलेली नाही. तुम्हाला लिप्टमध्येही चढता येणार नाही हाच धोशा त्यांनी लावला. त्यावर राजा यांनी, तुम्ही मंत्र्यांच्या पर्सनल स्टाफकडे माझ्या भेटीबाबत विचारणा तर करा, असे सांगितले. त्यानंतर अधिकाऱ्यांनी विचारणा केली असता, राजा यांना सांयकाळी पाचला मंत्र्यांच्या भेटीची वेळ निश्‍चित झाल्याचे सांगण्यात आले.