दार्जिलिंगने घेतला पुन्हा मोकळा श्‍वास

वृत्तसंस्था
गुरुवार, 28 सप्टेंबर 2017

जनजीवन पूर्ववत होण्यास सुरवात

दार्जिलिंग (पश्‍चिम बंगाल)  : दार्जिलिंगमधील 104 दिवस सुरू असलेला बंद अखेर मागे घेण्यात आल्यानंतर येथील जनजीवन पूर्ववत झाले आहे. वेगळ्या दार्जिलिंगच्या मागणीसाठी राजकीय आंदोलन, हिंसाचार आणि तणावामुळे घुसमटलेल्या दार्जिलिंगने पुन्हा एकदा मोकळा श्‍वास घेतला आहे.

चहाच्या मळ्यांचे कामकाज पुन्हा सुरू झाले असून, मळ्यातील स्वच्छतेचे काम सकाळपासून कामगारांनी सुरू केल्याचे चित्र दिसले. दार्जिलिंगमधील बंदचा फटका चहाच्या मळ्यांना मोठ्या प्रमाणात बसला होता. निर्यातीसाठी सर्वाधिक मागणी असलेल्या दुसऱ्या हंगामातील चहाचे उत्पादन वाया गेले होते. दार्जिलिंगमधील सर्व दुकाने आणि बाजारपेठा सुरू झाल्या असून, रस्त्यांवरील वाहतूकही नेहमीप्रमाणे दिसत आहे. पर्यटक येथे पुन्हा येऊन पर्यटनाला बहर येईल, अशी आशा सहलींचे आयोजक आणि हॉटेल मालक व्यक्त करीत आहेत.

गोरखा जनमुक्ती मोर्चासह सर्वच राजकीय पक्षांनी दार्जिलिंगमधील नागरिकांना दुर्गा पूजेच्या शुभेच्छा दिल्या आहेत. अनेक स्वयंसेवी संस्थांनी मिठाईचे वाटपही केले आहे. येथील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती, ती 25 सप्टेंबरपासून पूर्ववत करण्यात आली. गोरखा जनमुक्ती मोर्चाने दार्जिलिंगमधील बेमुदत बंद 27 सप्टेंबरपासून मागे घेतला आहे.