सात तासांच्या चौकशीनंतर दिनकरनची आज पुन्हा चौकशी

वृत्तसंस्था
रविवार, 23 एप्रिल 2017

तमिळनाडूतील आर के नगर येथील पोटनिवडणुकीसाठी एआयडीएमकेचे दोन पानांचे अधिकृत चिन्ह मिळावे यासाठी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना लाच देण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी एआयडीएमकेचे उपसचिव टीटीव्ही दिनकरन यांची चौकशी सुरू आहे. दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने त्यांची तब्बल सात तास चौकशी केल्यानंतर त्यांना आज (रविवार) पुन्हा चौकशीला सामोरे जावे लागणार आहे.

नवी दिल्ली : तमिळनाडूतील आर के नगर येथील पोटनिवडणुकीसाठी एआयडीएमकेचे दोन पानांचे अधिकृत चिन्ह मिळावे यासाठी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना लाच देण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी एआयडीएमकेचे उपसचिव टीटीव्ही दिनकरन यांची चौकशी सुरू आहे. दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने त्यांची तब्बल सात तास चौकशी केल्यानंतर त्यांना आज (रविवार) पुन्हा चौकशीला सामोरे जावे लागणार आहे.

दिनकरन यांची  शनिवारी सात तास चौकशी करण्यात आली होती. चौकशीदरम्यान वकिलांना सोबत येण्यास मनाई करण्यात आली होती. यावेळी दिनकरनचे फोन कॉल्स, व्हॉटसऍप मेसेजेस आणि एसएमएस तपासण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. ते चौकशीदरम्यान सहकार्य करत नसल्याचे वृत्त एका इंग्रजी वृत्तत्राने दिले आहे.

तमिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या निधनानंतर त्यांच्या निकटवर्तीय शशिकला यांनी पक्षावर वर्चस्व गाजविण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे पक्षात शशिकला आणि पक्षाचे नेते ओ. पनीरसेल्वम असे दोन गट पडले होते. जयललिता यांच्या आर के नगर येथील एका जागेसाठी नुकतीच पोटनिवडणुक घेण्यात आली होती. या निवडणुकीसाठी एआयडीएमकेचे दोन पानांचे अधिकृत चिन्ह मिळावे यासाठी दिनकरन यांनी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना लाच देण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. दरम्यान गेल्या काही दिवसांत पक्षातील फूट दूर करून सर्वांनी एआयडीएमकेसाठी एकत्र यावे, यासाठी हालचाली सुरू आहेत. शशिकला आणि दिनकरन यांची हकालपट्टी करण्याची अट पनीरसेल्वम यांनी केली आहे.