...पण जेटलींचे पितळ उघडे पाडणारच- जेठमलानींचा निर्धार

वृत्तसंस्था
मंगळवार, 4 एप्रिल 2017

मी फक्त श्रीमंत लोकांकडून खटल्या लढण्यासाठी पैसे घेतो. गरिबांकडून पैसे घेत नाही. केजरीवाल यांच्या सरकारने खटला लढण्यासाठी पैसे नाही दिले तरी मोफत लढेन.

नवी दिल्ली - दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याकडे अरुण जेटलींविरुद्धचा बदनामीचा खटला लढण्यासाठी पैसे नसतील, तर मी त्यांचा खटला मोफत लढेन. पण, या खटल्यात जेटलींना उघडे पाडणारच असे ठाम मत ज्येष्ठ वकील राम जेठमलानी यांनी व्यक्त केले आहे.

जेठमलानी म्हणाले, ''मी फक्त श्रीमंत लोकांकडून खटल्या लढण्यासाठी पैसे घेतो. गरिबांकडून पैसे घेत नाही. केजरीवाल यांच्या सरकारने खटला लढण्यासाठी पैसे नाही दिले तरी मोफत लढेन. या पूर्ण प्रकरणामागे जेटली यांचा हात आहे. केजरीवाल मला फी कशी देणार आहेत, हे मला माहिती नाही. माझे काम जेटलींविरोधात लढणे एवढेच आहे. त्यांना उघडे पाडण्यासाठी मी माझ्या खिशातील पैसे खर्च करेल.''

अरुण जेटली यांनी डिसेंबर 2015 मध्ये केजरीवाल यांच्यासह आम आदमी पक्षाचे (आप) नेते कुमार विश्वास, आशुतोष, संजय सिंह, राघव चढ्ढा आणि दीपक वाजपेयी यांच्याविरोधात 10 कोटी रुपयांचा मानहानीचा खटला दाखल केला होता. दिल्ली जिल्हा क्रिकेट संघटनेशी संबंधित हा खटला आहे.