संत आणि विचारजंत

Mother Terresa
Mother Terresa

आजपासून जवळपास सहा महिन्यांपूर्वी मराठीतल्या एका प्रतिष्ठित वर्तमानपत्रात एक अग्रलेख आला होता. त्या लेखात मदर तेरेसा यांच्यावर खरपूस टीका झाली होती. पण दुसऱ्याच दिवशी हा लेख वृत्तपत्राने मागे घेतला. त्याबद्दल कुठेलेही स्पष्टीकरण दिले गेले नाही. हा तडफदार अग्रलेख तडकाफडकी मागे घेतला गेला. कारण मदर तेरेसांवर अश्या स्वरूपाचा अग्रलेख लिहिल्यामुळे त्या धर्मातल्या सज्जनांच्या भावना दुखावल्या जाऊन त्याची परिणीती मोठ्या प्रमाणात या वृत्तपत्राच्या प्रती जाळण्यात झाली होती. ‘संपादकाला बघून घेऊ‘ अश्या स्वरूपाच्या धमक्या दिल्या गेल्या. अर्थात हे सगळं वृत्तपत्राने कधीच जाहीर केलं नाही. पण वृत्तपत्राचे संपादक त्याच वृत्तपत्रात एक सदर लिहितात. त्यातून त्यांनी हे सांगायचं काम केलं. या सगळ्या प्रकारात वृत्तपत्राचा नेभळट स्वभाव दिसला म्हणण्यापेक्षा त्या वृत्तसमूहाची डरपोक वृत्ती दिसली. मन काही काळ मागे, म्हणजे जवळपास १२ महिने मागे गेलं.

बारा महिन्यांपूर्वी पुरस्कारवापसी नावाची आलेली लाट आठवते? नयनतारा सहगल आजींनी याची सुरवात केली आणि हे प्रकरण जे सुरु झालं ते थेट जाऊन पोहोचलं अगदी पार पद्मभूषण मिळालेल्या शास्त्रज्ञांपर्यंत. जो तो एकंच रडगाणं गात होता. ‘देशात असहिष्णुता तयार झाली आहे‘. याचीच री ओढत आमीर खानसारखा स्वतःची ‘जबाबदार आणि अभ्यासू वगैरे प्रतिमा ‘तयार‘ केलेला मनुष्य ‘माझ्या बायकोने देश सोडायचा का?‘ असा प्रश्न केला वगैरे तीर मारून गेला. 

ही पुरस्कार वापसीची लाट थांबली कधी हे आठवतंय? 

ही लाट थांबली बरोबर बिहार विधासभा निवडणुकांच्या निकालांच्या आदल्या दिवशी. भाजपचा दणदणीत पराभव होऊन गेला आणि त्यादिवसापासून एकही पुरस्कार परत दिला गेला नाही. ही लाट इतकी मोठी होती की अगदी राष्ट्रपती प्रणव मुखर्जींनी विनंती करूनही थांबली नव्हती. त्यानंतरही देशात असहिष्णुता झाली आहे काय? असा प्रश्न पडावा अश्या अनेक घटना घडल्या. परंतु कोणीही पुरस्कार परत केला नाही. ही एकप्रकारे निवडक पुरोगामित्वाची कबड्डीच झाली. अनेक देशांमध्ये राजकीय पक्षांचं हे धोरण असतं. सत्तेत असताना अनेकांना उपकृत करून ठेवावं. सत्ता नसताना ही लोक कमी येतात. या विधवा विचारवंतांच्या वावदूक पुरस्कार वापसीचा अर्थ हाच होता. 

गेल्या गणपतीच्या सुमारास विश्वास साक्रीकर नावाच्या कथित गणेश भक्त आणि अभ्यासकाने एका मराठी वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. त्यावरून पुरोगामी विचारवंतांनी केवढं वादळ उभं केलं होतं. विश्वास साक्रीकरसारख्या व्यक्तींची मुलाखत येते म्हणजे धार्मिक अजेंडा राबवला जायला कसा मीडिया सहमत आहे वगैरे वाद विविध पुरोगामी विचारवंतांनी सुरु केले. 

आज या सगळ्या गोष्टी आठवायचं कारण म्हणजे गेल्या गणपतीतील ती मुलाखत, पुरस्कार वापसी या सगळ्या प्रकाराला एक वर्ष होतंय. त्या मदर तेरेसांच्या अग्रलेखाला सहा महिने झाले. एका वृत्तपत्राला अख्खा अग्रलेख मागे लागतो आणि त्याच्या बिरादरीतले लोक काहीच बोलत नाहीत. कोणत्याही वृत्तवाहिन्यांवर कसलीच चर्चा नाही. कोणत्याही प्रकारचा पुरस्कार परत नाही. घसा ताणून कोणी काहीच बोललं नाही. अडीच टक्के लोकसंख्या असलेल्या धर्माच्या एका तथाकथित (आणि वादग्रस्त) दैवतावर टिका केली की साक्षात त्या मोठ्या वर्तमानपत्राला चक्क अग्रलेख मागे घ्यावा लागतो. आणि कोणालाच यात कसलीच असहिष्णुता दिसत नाही. एका इंग्रजी (म्हणजेच मोठ्या!) वृत्तपत्रात मदर तेरेसांच्या चमत्कारांवर दोन पाने भरभरून येतात आणि त्यांच्या संतापदाची वकिली केली जाते. कोणीही पुरोगामी जागचा हालत नाही. ज्ञानेश्वरांनी चमत्कार केले कि नाहीत यावर पांडित्यपूर्ण चर्चा करणाऱ्या लोकांना, विश्वास साक्रीकर कसा भोंदू आहे हे पटवून देणाऱ्या लोकांना या गोष्टीवर आवाज उठवण्याची गरजही भासू नये? मदर तेरेसा यांच्या चमत्काराला नमस्कार होतो, कारण ज्ञानेश्वरांनी भिंत चालवून दाखवली वगैरे तत्सम चमत्काराला आम्ही कधीच तर्काच्या तागडीत तोललं नाही, हा युक्तिवाद शंभर टक्के खरा आहे. परंतु आजच्या युगात या चमत्काराविरुद्ध वेळोवेळी प्रश्नचिन्ह उभं केलं गेलंय. वेगवेगळ्या थिअरी यावर मांडल्या गेल्या आहेत. तुकारामांची गाथा इंद्रायणीत बुडवली गेली ती वर कशी काय आली? आणि आली असेल तर बुडणारे कागद तरंगले कसे? का त्यावेळेस ओले न होता पाण्यावर येऊन तरंगणारे वेगळ्या दर्जाचे विशेष कागद बाजारात होते, यावर आजही वाद घालता येतो, आणि तुकोबांना सदेह वैकुंठाला न्यायला विमान आलं नव्हतं तर काहीतरी वेगळंच घडलं होतं, यावर वाद घालणारं साहित्य समाजात उपलब्ध आहे. पण म्हणून ज्ञानोबा आणि तुकोबांच्या चमत्कारांवर किंवा मांडलेल्या सिद्धांतांवर चर्चा झालीच ना? ज्ञानेश्वर माउलींवर टीका केली म्हणून नामदेव ढसाळांना ‘या सत्तेत जीव रमत नाही‘ हा काव्यसंग्रह मागे घ्यावा लागला नाही. मदर तेरेसा यांच्या संतापदावर प्रश्नचिन्ह उठवायला एकही पुरोगामी लेखणी पुढे सरसावू नये? 

तीन वेळेस तलाक देण्याच्या पद्धतीला आव्हान देणारा खटला सध्या न्यायपालिकेत प्रलंबित आहे. ‘जर तीन वेळा तलाक दिला गेला नाही तर पुढील सर्व वेळखाऊ न्यायप्रक्रिया टाळण्यासाठी म्हणून पुरुष स्त्रीला मारहाण करू शकतो किंवा जिवंत जाळू शकतो‘ अशी भीती ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने व्यक्त केली आहे. एकही पुरोगामी आवाज यावर उठू नये? ‘पुरुषाला निर्णयक्षमता असते आणि भारतीय संस्कृती पुरुषप्रधान आहे म्हणून तलाकचा हा अधिकार अबाधित राहावा असा या बोर्डाचा पवित्रा कुठल्याही वाहनावर चर्चेचा विषय होऊ शकत नाही का? 

यातून हिंदुत्वावाद्यांच्याच नव्हे तर सामान्य माणसाच्या मेंदूलाही प्रश्न पडतो. हिंदूंवर बोलताना यांची विचारसरणी आणि विवेक जागृत कसा काय असतो? इतर धर्मांवर हे लोक सोयीस्कर गप्प बसतात की घाबरतात. नाहीतर इतर धर्म हे सर्वार्थाने परिपूर्ण असून त्याबद्दल बोलायचीही गरज नाही याची खूणगाठ सर्वांनाच मनाशी बांधावी लागेल. 

अल्पसंख्याक समाजाबद्दल बोलताना विवेकवादी आणि पुरोगाम्यांच्या तलवारी थर्माकोलच्या होऊन जातात. आवाज उठवणारा दाखवा आणि बक्षीस मिळवा. भक्तमंडळींनी या तलवारी गणपतीच्या मखरात आरास म्हणून वापराव्यात. देव जर खरंच कुठे असेल या देशातल्या पुरोगाम्यांना त्याची खरी गरज आहे. आचार्य अत्र्यांच्या शैलीत सांगायचं झालं तर पूर्वीचे ते संत आणि आत्ताचे आहेत ते विचारजंत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com