वेदांता कंपनीला दिलेली जमीन परत घेण्याचा निर्णय

वृत्तसंस्था
बुधवार, 30 मे 2018

तुतीकोरिन येथील वेदांता समूहाच्या स्टरलाइट कॉपर प्रकल्पाच्या प्रस्तावित विस्तारासाठी दिलेली जागा तमिळनाडू राज्य औद्योगिक विकास महामंडळाने (एसआयपीसीओटी) आज परत घेण्याचा निर्णय घेतला.

चेन्नई - तुतीकोरिन येथील वेदांता समूहाच्या स्टरलाइट कॉपर प्रकल्पाच्या प्रस्तावित विस्तारासाठी दिलेली जागा तमिळनाडू राज्य औद्योगिक विकास महामंडळाने (एसआयपीसीओटी) आज परत घेण्याचा निर्णय घेतला. तमिळनाडू सरकारने राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाला स्टरलाइट कॉपर उद्योग कायमस्वरूपी बंद करण्याचे निर्देश दिलेले असताना दुसऱ्याच दिवशी जमीनवाटप रद्दचा निर्णय जाहीर करण्यात आला. या प्रस्तावित उद्योगाच्या विरोधात गेल्या आठवड्यात नागरिकांनी जोरदार आंदोलन केले होते आणि यादरम्यान आंदोलकावर झालेल्या गोळीबारात 13 जणांचा मृत्यू झाला होता. 

वेदांता समूहाला पाठवलेल्या पत्रात म्हटले, की कंपनीच्या प्रस्तावित विस्तारासाठी एसआयपीसीओटीकडून जमीन देण्यात आली होती. मात्र, जनहित लक्षात घेता वेदांता लिमिटेडच्या कॉपर प्रकल्प (दुसरा टप्पा) याचा प्रस्तावित विस्तार रद्द करण्यात येत आहे. एसआयपीसीओटीच्या निकषानुसार जमिनीसाठी घेतलेली रक्कम परत केली जाईल, असेही नमूद केले आहे. तूतीकोरीन येथे एसआयपीसीओटी औद्योगिक वसाहतीत एक कॉपर प्रकल्प उभारण्यावरून अनेक आरोप-प्रत्यारोप झाले होते आणि प्रदूषणाबाबत चिंता व्यक्त करण्यात आली होती. 342.22 एकराची जमिनीचे वाटप जनहित लक्षात घेऊन रद्द करण्यात आले असून, यासंबंधी कंपनीला कळविण्यात आल्याचे म्हटले आहे.

Web Title: The decision to withdraw the land given to Vedanta Company