दिल्लीत शाळेजवळ गॅस गळती; 105 मुले रुग्णालयात

वृत्तसंस्था
शनिवार, 6 मे 2017

पोलिस आणि अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून, विद्यार्थ्यांना रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

नवी दिल्ली - दक्षिण दिल्लीतील तुगलकाबाद येथील एका शाळेजवळ गॅस गळतीमुळे मुलांना त्रास होऊ लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सर्व मुलांची प्रकृती धोक्याबाहेर आहे.

तुगलकाबादमधील पूल प्रल्हादपूर येथील राणी लक्ष्मीबाई शाळेतील विद्यार्थ्यांना गॅस गळतीमुळे त्रास झाला. अनेक विद्यार्थी बेशुद्ध पडल्याने तात्काळ त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. पूर्ण शाळा मोकळी करण्यात आली आहे. शाळेत सुमारे 3500 विद्यार्थी होते. सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे. आज पहाटे पाच वाजता शाळे शेजारी लावण्यात आलेल्या कंटेनरमधून गॅस गळती होत असल्याने विद्यार्थ्यांना त्रास होण्यास सुरवात झाली. 

पोलिस आणि अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून, विद्यार्थ्यांना रुग्णालयात हलविण्यात आले आहे. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदीया यांनी या प्रकरणी शाळेच्या मुख्याध्यापकांशी चर्चा केली.

Web Title: Delhi: Gas leak at Tughlakabad, over 105 students rushed to hospital