दिल्ली, मुंबईसह देशभरात छापे

money
money

नवी दिल्ली - केंद्र सरकारने चलनातून एक हजार आणि पाचशे रुपयांच्या जुन्या नोटा रद्द केल्यानंतर अनेक ठिकाणांवरून बेहिशेबी काळा पैसा बाहेर पडू लागला आहे. काही महाभागांनी आपले पैसे कचराकुंड्यांमध्ये टाकल्याच्या पार्श्‍वभूमीवर प्राप्तिकर विभागाने आज दिल्ली, मुंबईसह अन्य बड्या शहरांत अनेक ठिकाणांवर छापे टाकल्याचे समजते. सराफा व्यावसायिक आणि हवाला ऑपरेटर्स यांच्यावर ही कारवाई झाली.

या कारवाईमध्ये नेमकी किती बेहिशेबी रक्कम हाती लागली याचा तपशील मिळू शकलेला नाही. दरम्यान, बॅंकांत पैसे बदलून घेण्यासाठी होत असलेली गर्दी लक्षात घेऊन ‘एनईएफटी’ आणि धनादेश वटविण्याचे व्यवहार शनिवार आणि रविवारी (ता.१२ आणि ता.१३) देखील सुरू ठेवण्याचा निर्णय रिझर्व्ह बॅंकेने घेतला आहे.

अनिवासी भारतीयांना बॅंकांमध्ये पैसे जमा करायचे असतील अथवा त्यांना नोटा बदलून घ्यायच्या असतील तर त्यांना व्यवहार करताना जबाबदार अधिकाऱ्याचे पत्र सोबत जोडावे लागणार आहे. आज देशभरातील बॅंकिंग व्यवहारामध्ये २० टक्‍क्‍यांची वाढ झाल्याचे आढळून आल्याचे स्टेट बॅंक ऑफ इंडियाने म्हटले आहे. एखाद्या प्रसंगी एक अथवा दोन बनावट नोटा आढळल्या तर तो मोठा मुद्दा नाही; पण बनावट नोटांचे प्रमाण अधिक असल्यास मात्र पोलिस त्याची चौकशी करतील, असेही ‘एसबीआय’च्या वतीने सांगण्यात आले.

एअर इंडियाचे ‘रिफंडेबल’ बंद

हजार आणि पाचशे रुपयांच्या जुन्या नोटांद्वारे विमानाची तिकिटे खरेदी करून नंतर तीच तिकिटे रद्द करून नव्या नोटांच्या रूपात रिफंडिंग मिळवणाऱ्या ग्राहकांना एअर इंडिया कंपनीने चाप लावला आहे. अशा ग्राहकांना रिफंडिंग न करण्याचा निर्णय कंपनीच्या व्यवस्थापनाने घेतला आहे. आता अशा पद्धतीने घेतली जाणारी विमानांची तिकिटे रद्द होणार नसून, त्याचा परतावादेखील ग्राहकांना मिळणार नाही. केंद्र सरकारनेच तसे स्पष्ट आदेश विमान कंपन्यांना दिले आहेत. मुलकी विमान वाहतूक संचालनालयाकडून आदेश मिळताच कंपन्या कामाला लागल्या आहेत.

अशा बदला नोटा...

  •  नोट बदलण्यासाठी इच्छुकांनी आवश्‍यक माहितीसह एक फॉर्म भरून बॅंकेत जमा करावा. त्यामुळे कमीत कमी वेळेत नोटा बदलून मिळतील.
  •  बॅंकांच्या सर्व शाखांमध्ये प्रत्येक व्यक्तीला एका दिवशी ४ हजार रुपयांपर्यंत नोटा बदलता येऊ शकतात.
  •  एका खात्यातून दुसऱ्या खात्यात पैसे ट्रान्सफर करण्यावर कोणतेही बंधन नाही. 
  •  बॅंक खात्यामध्ये जुन्या नोटा जमा करण्यावर कोणतीही मर्यादा नाही
  •  एटीएममधून सुरवातीला १८ नोव्हेंबरपर्यंत एका दिवशी २ हजार रुपये आणि त्यानंतर चार हजार रुपये काढता येऊ शकतील
  •  ३१ डिसेंबरपर्यंत एटीएम सेवा पूर्णपणे निःशुल्क करण्यात आली आहे
  •  नोटा बदलण्याची प्रक्रिया ३० डिसेंबरपर्यंत सुरू राहणार आहे.
  •  वीजबिलांचा भरणा करण्यासाठी उद्या (शुक्रवार) रात्रीपर्यंत ५०० आणि १००० रुपयांच्या जुन्या नोटा स्वीकारल्या जाणार
  •  एक हजार रुपयांची नोट आकर्षक डिझाइनसह नव्या रूपात येणार
  •  नोटांवरील बंदीप्रकरणी केंद्र सरकारचे सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com