चंद्रकांतदादांना शेतीबद्दल कमी माहिती दिसते- शरद पवार

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 6 जून 2017

भाजपच्या राष्ट्रीय, राज्यांच्या निवडणुकांमधील जाहीरनाम्यात शेतकऱ्यांची कर्जमाफी देण्याचे जाहीर आश्वासन देण्यात आलेले आहे. मग त्याची अंमलबजावणी का नाही केली, असा मुद्दा पवार यांनी उपस्थित केला.  

नवी दिल्ली : "संयुक्त पुरोगामी आघाडीचं (युपीए) सरकारमध्ये मी केंद्रीय कृषिमंत्री असताना संपूर्ण देशातील शेतकऱ्यांची कर्जे आम्ही माफ केली होती. स्वामिनाथन समिती स्थापनाच मी केली होती. मात्र, चंद्रकांत पाटील हे शिक्षक मतदारसंघातून आलेले आहेत, त्यामुळे त्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नांबद्दल जास्त माहिती नसावी," अशी खोचक टीका करीत शरद पवार यांनी त्यांना प्रत्युत्तर दिले. 

'पवार स्वतः कृषिमंत्री होते तेव्हा त्यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न का सोडवले नाहीत. त्यांनी स्वामिनाथन समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी का केली नाही,' असे सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटले होते. त्यावर पवार यांनी उपरोधिक शब्दांत वरील उत्तर दिले. माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. सध्या देशभरात गाजत असलेले महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे प्रश्न त्यांनी पंतप्रधानांकडे मांडले. पवार यांनी पंतप्रधान मोदींना भेटून सध्या राज्यातील शेतकऱ्यांच्या असलेल्या परिस्थितीचे तपशील सांगितले. 

पवार म्हणाले, "आम्ही शेतीकर्जावरील व्याजदर 4 टक्क्यांवर आणला. महाराष्ट्राने तर हा व्याजदर शून्य टक्क्यांपर्यंत आणून, कर्ज पुरवठा केला. आमच्या काळात तब्बल 70 हजार कोटी रुपयांची कर्जे माफ केली. स्वामिनाथन समितीच्या 50 टक्के मागण्या पूर्ण केल्या. उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव देण्यावर अंमलबजावणी करताना इतर राज्यांनी काही वेगळ्या मागण्या करीत आक्षेप घेतला. त्यावर सर्व राज्यांच्या प्रमुखांची बैठक आम्ही बोलावून त्यावर तोडगा काढण्याचे ठरविले. त्यानंतर निवडणुका सुरू झाल्याने तो मुद्दा मागे मागे पडला. मग त्यानंतर भाजप सत्तेत आल्यावर त्यांनी गेल्या 3 वर्षांत त्यावर काहीच का केले नाही, असा सवाल पवार यांनी उपस्थित केला. 

अल्पभूधारकांना न्याय देऊ असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले आहे. त्याबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करताना पवार म्हणाले, "जिथे पाणी उपलब्ध आहे तिथेच बागायती भागांमध्ये अल्पभूधारकांची संख्या अधिक आहे. मात्र, पाणी नाही तिथे जमीनधारणा जास्त आहे. त्यामुळे फक्त अल्पभूधारकांना कर्जमाफी देण्याचा हा विचार विसंगत आहे. यामुळे सर्व गरजू शेतकऱ्यांना लाभ मिळणार नाही."

आवर्जून वाचा
टायमिंग चुकलेलं आंदोलन; चुकीची शहरी मानसिकता
शेतकरी संप :विनाशकाले विपरीत बुध्दी ।
लंडनमधील मराठीजन घेणार 'गाव दत्तक योजने'त सहभाग
सुटीच्या दिवशी जास्त झोपल्याने होतो हृदयविकार