सम-विषय योजनेस तूर्त स्थगिती; दिल्ली सरकार जाणार हरित लवादाकडे

वृत्तसंस्था
शनिवार, 11 नोव्हेंबर 2017

हरित लवादाच्या खंडपीठाचे न्यायाधीशांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सम-विषमची योजना लागू करण्यास सूचना केली होती. तसेच दिल्लीत वायू प्रदूषण हा गंभीर विषय असताना सरकारवर काय उपाययोजना केल्या, ही योजना यापूर्वीच का लागू केली गेली नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

नवी दिल्ली : दिल्लीतील वाढत्या प्रदूषणावर उपाय म्हणून हरित लवादाने राज्यात सम-विषम योजना पुन्हा सुरू करण्यास सशर्त मंजूरी दिली. मात्र, या निर्णयाविरोधात दिल्ली सरकार हरित लवादाकडे जाणार असल्याचे सांगत या निर्णयाला तूर्त स्थगिती दिली आहे. त्यामुळे राज्यात सोमवारपासून ही योजना सुरु होणार नसल्याची माहिती मिळत आहे.

काही महिन्यांपूर्वी दिल्लीत विषारी वायूचे प्रमाण वाढले होते. यातील मुख्य कारण हे दुचाकी वाहनांमधून निघणाऱ्या धुराचे असल्याचे समोर आले होते. त्यानंतर राज्यात सम-विषम योजना लागू करण्यात आली होती. मात्र, काही कालावधीनंतर ही योजना बंद झाली. त्यानंतर पुन्हा एकदा राजधानी दिल्लीत प्रदुषणाची समस्या उद्भवली आहे. यावर नियोजन करण्यासाठी सरकारकडून अद्यापही उपाययोजना केल्या गेल्या नसल्याने अखेर आज हरित लवादाने सम-विषय योजना लागू करण्यास सशर्त परवानगी दिली होती. मात्र, या निर्णयाविरोधात दिल्ली सरकार हरित लवादाकडे जाणार आहे.

हरित लवादाच्या खंडपीठाचे न्यायाधीशांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सम-विषमची योजना लागू करण्यास सूचना केली होती. तसेच दिल्लीत वायू प्रदूषण हा गंभीर विषय असताना सरकारवर काय उपाययोजना केल्या, ही योजना यापूर्वीच का लागू केली गेली नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. नायब राज्यपालांनी याबाबत प्रस्ताव दिल्यानंतर यावर काय कार्यवाही केली अशी विचारणाही त्यांनी यावेळी केली.

दरम्यान, दिल्ली सरकारच्या या निर्णयामुळे हरित लवाद काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.