दहशतवाद, बनावट नोटांचे जाळे उद्ध्वस्त होईल - जेटली

वृत्तसंस्था
मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016

या निर्णयाने अर्थव्यवस्थेत पारदर्शकता येणार असून, डिजीटल अर्थव्यवस्था सक्षम होणार आहे. संसदेत आम्ही या विषयावर चर्चेस तयार आहोत. पण, विरोधी पक्षाला चर्चा नको आहे. काळ्या पैशावर गेल्या अडीच वर्षात जेवढे काम झाले आहे. ते गेल्या 70 सत्तर वर्षात होऊ शकलेले नाही.

नवी दिल्ली - पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटांवर बंदी घालण्याच्या निर्णयामुळे दहशतवाद आणि बनावट नोटांच्या जाळे उद्ध्वस्त होईल, असा विश्वास अर्थमंत्री अरुण जेटली यांनी व्यक्त केला.

भाजपच्या संसदीय समितीच्या बैठकीत नोटबंदीच्या निर्णयावर बोलताना जेटलींनी या निर्णयाचे समर्थन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 नोव्हेंबरला पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटांवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयावर विरोधी पक्षांकडून जोरदार टीका करण्यात आली आहे.

याविषयी बोलताना जेटली म्हणाले, की नोटा रद्द केल्याच्या निर्णयाला नागरिकांनी 'सर्जिकल स्ट्राईक' म्हणू नये. रोखीच्या व्यवहारामुळे अर्थव्यवस्थेत काळा पैसा वाढतो. नरेंद्र मोदी सरकारने देशहितासाठी हा निर्णय घेतला असून याचा नजीकच्या काळात नक्कीच फायदा होणार आहे. याचा परिणाम आता दिसायला लागला आहे, बँकांनी व्याजदरात कपात सुरू केली आहे. सद्यस्थितीत सरकारला 4 ते 5 लाख कोटी रुपयांची उधारी द्यावी लागते. नागरिकांनी प्रामाणिकपणे कर भरल्यास कर्ज घेण्याची गरज राहणार नाही. सरकार येत्या काळात गावांच्या विकासावर लक्ष केंद्रित करणार आहे. नोटबंदीच्या निर्णयामुळे काही अडचणी येणार हे स्वाभाविकच होते. पण, आता परिस्थिती सुधारत आहे. नोटबंदीच्या निर्णयाची गोपनियता राखणे आवश्यक होते. या निर्णयाने अर्थव्यवस्थेत पारदर्शकता येणार असून, डिजीटल अर्थव्यवस्था सक्षम होणार आहे. संसदेत आम्ही या विषयावर चर्चेस तयार आहोत. पण, विरोधी पक्षाला चर्चा नको आहे. काळ्या पैशावर गेल्या अडीच वर्षात जेवढे काम झाले आहे. ते गेल्या सत्तर वर्षात होऊ शकलेले नाही.