अच्छेदिनच्या नावाखाली गरिबांची लूट - ममता

वृत्तसंस्था
मंगळवार, 27 डिसेंबर 2016

नियोजन नसल्याने नोटाबंदीचा निर्णय फसला. देशातील प्रत्येक गरिब नागरिक त्रासात आहे. मोदी सरकारने शेतकरी व गरिब नागरिकांना लुटण्याचे काम केले. नोटाबंदीमुळे देश 30 वर्षे मागे गेला. नोटाबंदीने काळ्या पैशावर परिणाम नाही.

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेला नोटाबंदी निर्णय हा सर्वांत मोठा गैरव्यवहार असून, अच्छे दिनच्या नावाखाली शेतकरी व गरिब नागरिकांची लूट करण्यात आली. गेल्या 50 दिवसांत काय उद्देश सफल झाला याचे उत्तर मोदींनी दिले पाहिजे, अशी जोरदार टीका पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केली.

नोटाबंदीच्या निर्णयाला तीन दिवसांनंतर 50 दिवस पूर्ण होत आहेत. पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा बदलून घेण्याची मुदत 30 सप्टेंबरला संपणार आहे. अद्याप बँक आणि एटीएमबाहेर नागरिकांच्या रांगा आहेत. याच मुद्द्यावरून विरोधकांकडून मोदी सरकारवर जोरदार टीका करण्यात आली आहे. ममता बॅनर्जी यांनी यापूर्वीही सरकारवर टीका केली आहे.

ममता बॅनर्जी म्हणाल्या, ''नियोजन नसल्याने नोटाबंदीचा निर्णय फसला. देशातील प्रत्येक गरिब नागरिक त्रासात आहे. मोदी सरकारने शेतकरी व गरिब नागरिकांना लुटण्याचे काम केले. नोटाबंदीमुळे देश 30 वर्षे मागे गेला. नोटाबंदीने काळ्या पैशावर परिणाम नाही. रोजगार बंद होण्याची वेळ आली आहे. नोटाबंदीमुळे लोकांचे बुरे दिन आले. निर्णय घेताना संसदेलाही विश्वासात घेतले नाही. नोटाबंदी देशातील सर्वांत मोठी अघोषित आणीबाणी आहे. नोटाबंदीने नागरिकांच्या मुलभूत अधिकारांवर गदा आणली आहे. नोटाबंदीच्या निर्णयावरून मोदींनी राजीनामा दिला पाहिजे.