गोव्यात खातेवाटपाचा तिढा कायम

गोव्यात खातेवाटपाचा तिढा कायम

पणजी - मुख्यमंत्रीपदी मनोहर पर्रीकर कायम राहतील असा निर्णय भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी घेतला असला तरी राजकीय तिढा खातेवाटपाच्या रूपाने कायम आहे. आठवडाभर सुरु असलेल्या राजकीय चर्चांना विराम मिळेल असे वाटत असतानाच अर्थ आणि गृह ही खाती कोणाला मिळतील याची चर्चा सुरू झाली आहे.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी खातेवाटप आणि मंत्रिमंडळातील बदल लवकरच केले जातील असे जाहीर करत राजकीय उत्सुकता कायम ठेवली आहे.

भाजप पर्रीकर यांचे नेतृत्व बदलणार नाही असे पूर्वीच स्पष्ट होते. मात्र उपमुख्यमंत्रीपद सुदिन ढवळीकर यांच्याकडे सोपविण्यास गोवा फॉरवर्ड आणि अपक्षांनी विरोध केला होता. त्यामुळे सरकारची सूत्रे ढवळीकर देण्याच्या निर्णय भाजपच्या राष्ट्रीय नेतृत्वाने घेतलेला नाही. तसा निर्णय घेण्यास भाजपमधून असलेला विरोधी शहा यांनी विचारात घेतल्याची दिसते. पर्रीकर यांचेच सरकारचे नेतृत्व कायम ठेवण्याचा निर्णय पक्षाच्या राज्यातील गाभा समितीसोबतच्या चर्चेनंतर घेतला गेला आहे असे शहा यांनी ट्विटरवर स्पष्ट केले आहे. यामुळे पक्षाची आणि सरकारची छबी सुधारण्यासाठी नेतृत्वबदलाची चर्चा करणाऱ्या नेत्यांना आता तो मुद्दा चर्चेसाठी राहिला नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

गोवा फॉरवर्ड आणि महाराष्ट्रावादी गोमंतक पक्ष यांच्यातील संघर्षात भाजपच्या आघाडी सरकारचे नुकसान होऊ नये म्हणून पर्रीकर यांच्याकडेच नेतृत्व कायम ठेवण्याच्या निर्णय भाजपला घ्यावा लागला आहे. यामुळे भाजपमधून आतातरी आमच्याकडे नेतृत्व येईल असे वाटणाऱ्यांचा मात्र हिरमोड झाल्यातच जमा आहे. भाजपच्या शिस्तीनुसार जाहीरपणे होय माझी मुख्यमंत्री व्हायची इच्छा आहे असे कोणी म्हणणार नव्हते मात्र गेल्या १० दिवसांतील घडामोडी पाहिल्यास भाजपने पर्यायी नेतृत्वाचा विचार चालवला होता हे दिसून येते.

आता खातेवाटपाचा तिढा कायम राहिला आहे. लवकरच हा निर्णय घेतला जाईल असे शहा यांनी म्हटले आहे तरी मुख्ममंत्री मनोहर पर्रीकर यांच्याकडील महत्वाची खाती आपणाला मिळावीत यासाठी मगो आणि गोवा फॉरवर्डकडून केले जाणारे दबावाचे राजकारण आता दिसून येणार आहे. आम्हाला अमूक एका खात्याची अपेक्षा नाही असे राजकरणात वरकरणी सांगावे लागत असले तरी वित्त, गृह अशी महत्वाची खाती आपल्याकडे असावीत असे कोणालीही वाटणे साहजिक आहे. नेतृत्वाच्या प्रश्नावर आठवडा गेला तर खातेवाटपासाठी किती वेळ लागेल हे आताच सांगता येणारे नाही.

हा सारा बदल करताना आजारी मंत्री अॅड फ्रांसिस डिसोझा आणि पांडुरंग मडकईकर यांच्याबाबत कोणता निर्णय भाजप घेणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. लोकसभेची येती निवडणूक डोळ्यांसमोर ठेऊन हे सारे ठरवले जाणार आहे. मंत्रिमंडळात समावेशासाठी भाजपमध्ये इच्छुकांची संख्या कमी नाही. गोवा फ़ॉरवर्डच्या तिन्ही अामदारांना मंत्रिपदे मिळतात, मगोचे दोन मंत्री होतात मग भाजपची आमदार संख्या १३ असूनही भाजपच्या वाट्याला केवळ ५ मंत्रीपदे का असा प्रश्न भाजपच्या आमदारांकडून आजवर खासगी पातळीवर विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाला वाचा फुटण्यास तसा वेळ लागणार नाही. त्यामुळे नेतृत्वाचा पेच सुटला तरी मंत्रिमंडळ फेरबदल आणि खातेवाटपाचा तिढा कायम आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com