'सर्जिकल स्ट्राइक' झालेले दहशतवादी तळ सक्रिय 

वृत्तसंस्था
बुधवार, 12 एप्रिल 2017

नवी शस्त्रे, नवे तंत्रज्ञान 
उरी हल्ल्यानंतर नियंत्रणरेषेनजीक दहशतवादी नवी रणनीती, शस्त्रे आणि तंत्रज्ञान वापरू लागल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे भारतीय लष्कराची डोकेदुखी वाढली आहे. तसेच आता पूर्वीप्रमाणे दहशतवादी घुसखोरीसाठी उन्हाळ्याची प्रतीक्षा करत नसल्याचे समोर आले आहे. गिर्यारोहकांचे बूट आणि अत्याधुनिक कपडे परिधान करून ते हिवाळ्यातही घुसखोरीचा प्रयत्न करत आहेत. तसेच संपर्कासाठी ते रेडिओ सेट ब्लूटूथने मोबाईलशी जोडत आहेत. त्यामुळे लष्कराला या संदेशांचा शोध घेणे अवघड जात आहे, असे कालिता यांनी नमूद केले. 

नवी दिल्ली - उरीतील लष्करी तळावरील दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने नष्ट केलेले पाकव्याप्त काश्‍मीरमधील दहशतवादी तळ पुन्हा सुरू झाल्याचे वृत्त आहे. नियंत्रणरेषेनजीक हे तळ पुन्हा सुरू झाले असून, बर्फ वितळू लागल्याने हे दहशतवादी भारतात घुसखोरीच्या तयारीत आहेत. 

बारामुल्लातील लष्कराच्या 19 व्या तुकडीचे प्रमुख मेजर जनरल आर. पी. कालिता यांनी उरीच्या विरुद्ध दिशेला पाकव्याप्त काश्‍मीरमध्ये दहशतवादी तळ पुन्हा सक्रिय झाल्याच्या वृत्ताला एका इंग्रजी वृत्तवाहिनीशी बोलताना दुजोरा दिला. उरीतील हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये पाकव्याप्त काश्‍मीरमध्ये घुसून तेथील दहशतवादी तळ नष्ट केले होते.

या "सर्जिकल स्ट्राइक'नंतर दहशतवाद्यांनी तेथून पलायन केले होते; मात्र हिवाळ्यात दहशतवादी पुन्हा तेथे आले आहेत. त्यांचे तळ पुन्हा सक्रिय झाले आहेत. उन्हाळ्यात बर्फ वितळू लागल्यानंतर पाकिस्तानी लष्कर दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करण्यास मदत करते. आता ते भारतात घुसखोरी करण्याच्या तयारीत आहेत. उरी परिसरात नियंत्रणरेषेनजीक पाकव्याप्त काश्‍मीरमध्ये सध्या नऊ दहशतवादी तळ असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांनी दिली आहे, असे कालिता यांनी सांगितले. 