असंघटित क्षेत्रामधील डिजिटल व्यवहारात वाढ

वृत्तसंस्था
शनिवार, 15 जुलै 2017

हैदराबाद - केंद्र सरकारकडून "कॅशलेस' व्यवहारांना प्रोत्साहन देण्यात येत असल्याचे चांगले परिणाम दिसून येत असून, असंघटित क्षेत्रात डिजिटल व्यवहार वाढू लागले आहेत, अशी माहिती निती आयोगाचे सदस्य व्ही. के. सारस्वत यांनी शुक्रवारी दिली.

सारस्वत म्हणाले, ""डिजिटल व्यवहार वाढू लागले आहेत. आजच्या वृत्तपत्रांमध्येच भीम ऍपच्या माध्यमातून 65 लाख व्यवहार झाल्याचे वृत्त आहे. गेल्या वर्षी नोटाबंदी झाल्यानंतर अर्थव्यवस्थेत काही प्रमाणात मंदी आली होती. मात्र, आता परिस्थिती पूर्वपदावर आली आहे. बाजारपेठेत पुरेसा पैसा उपलब्ध आहे. असंघटित क्षेत्राला थेट रोकड स्वीकारण्याऐवजी "पाइंट ऑफ सेल' यंत्राचा फायदा समजला आहे. या यंत्रांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला असून, सरकारकडून ती जास्तीत जास्त प्रमाणात उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न सुरू आहेत.''

"असंघटित क्षेत्रातील वस्त्रोद्योग आणि कापड उद्योगात मोठ्या प्रमाणात व्यवहार उधारीवर होतात. त्यामुळे या क्षेत्रात "पॉईंट ऑफ सेल' यंत्रांचा वापर मर्यादित आहे. संघटित क्षेत्रातील डिजिटल व्यवहार दिवसेंदिवस वाढत आहेत. डिजिटायजेशनला प्रोत्साहन दिल्यामुळे कार्यक्षमता वाढली असून, भ्रष्टाचार कमी झाला आहे,'' असे सरस्वती यांनी सांगितले.