काश्‍मीरमधील मुलांना चिथावण्याचा प्रयत्न

वृत्तसंस्था
शुक्रवार, 31 मार्च 2017

जम्मू- काश्‍मीरमधील मुलांना चिथावणी दिली जात आहे. जवानांवर दगडफेक करण्यासाठी भडकवले जात आहे. त्यांना चुकीच्या मार्गावर नेले जात आहे. चकमकीच्या ठिकाणांवर जाण्यासाठी सांगितले जात आहे. त्याठिकाणी बंदुकीतून सुटलेली गोळी कुणाला लागेल हे ती पाहत नाही.
- एस. पी. वैद, पोलिस महासंचालक

पोलिस महासंचालक; पाकिस्तानच्या आयएसआयला धरले जबाबदार

जम्मू : जम्मू-काश्‍मीरमधील निष्पाप तरुण मुलांनी घराबाहेर पडून चकमकीच्या ठिकाणी पोचावे यासाठी पाकिस्तानची आयएसआय ही गुप्तचर संस्था चिथावण्याचा आणि डिवचण्याचा प्रयत्न करीत असल्याचे राज्याचे पोलिस महासंचालक एस. पी. वैद यांनी आज येथे सांगितले.

वैद यांनी पंतप्रधान कार्यालयातील केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांची काल नवी दिल्ली येथे भेट घेतली आणि काश्‍मीरमधील परिस्थितीविषयी सविस्तर चर्चा केली. मंगळवारी झालेल्या हिंसाचारात तीन व्यक्तींचा मृत्यू झाला होता आणि काही सुरक्षा रक्षकही जखमी झाले होते. या पार्श्‍वभूमीवर ही भेट झाली. त्यानंतर वैद यांनी एका अधिकृत निवेदनाद्वारे पाकिस्तानची आयएसआय संस्था मुलांना चिथावण्याचा प्रयत्न करीत असल्याची माहिती आम्हाला मिळाली असल्याचे म्हटले आहे.

दगडफेक झालेल्या घटनास्थळी होणाऱ्या चकमकींमध्ये नागरिकांना जीव गमवावा लागत आहे. मृतांची संख्या कमी करण्याचे आम्ही पुरेपूर प्रयत्न करतो; पण त्यात अपयशी ठरत आहोत, असेही वैद यांनी सांगितले. तरुणांना चिथावणी देऊन त्यांना सुरक्षा दलाच्या जवानांवर दगडफेक करण्यास सांगितले जात आहे. त्यांना वाममार्गावर नेण्याचे काम केले जात आहे. चकमकींच्या ठिकाणी जाण्यास सांगितले जात आहे, असेही ते म्हणाले.

बंदुकीतून सुटलेली गोळी समोर कोण आहे हे ओळखत नाही. अशा वेळी तरुणांनी घरी राहिलेलेच बरे. त्यांनी चकमक सुरू असलेल्या ठिकाणी जाऊ नये, असे आवाहनही वैद यांनी केले. चकमकींच्या स्थळी जाणारे तरुण आत्महत्या करण्यासाठीच जात आहेत, असेही विधान त्यांनी केले.

Web Title: Director General of police speak about kashmiri youth