गोवा सरकारकडून भ्रमनिरास, विरोधी पक्षनेत्यांची टीका

kavalekar
kavalekar

पणजी : गोवा सरकारने जनतेचा भ्रमनिरास केला आहे. सरकारकडून जनतेच्या खूप अपेक्षा होत्या मात्र सरकार त्या अपेक्षांची पूर्ती करण्यात पूर्ण अपयशी ठरले आहे. याचा फटका सत्ताधाऱ्यांना लोकसभा निवडणुकीत बसणार असून  दोन्ही जागा याखेपेला कॉंग्रेस जिंकेल असा दावा विधानसभेतील विरोधी पक्षनेते चंद्रकांत कवळेकर यांनी केला.

ते म्हणाले, लोक या सरकारला वैतागले आहेत. कामे होत नाहीत ही तक्रार केवळ आमदारांपुरती राहिलेली नाही तर लोकांचीही तीच तक्रार नाही. गटारे उपसण्यासाठी, रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यासाठी पैसे नसलेले सरकार जनतेने यापुर्वी कधीही पाहिलेले नव्हते. बेरोजगारीचा प्रश्‍न असेल वा खाणकामबंदीचा त्यातून मार्ग काढण्यात सरकार उदासीन आहे. सरकार सूड भावनेने वागेल म्हणून लोक बोलत नाहीत मात्र ग्रामीण भागाचा कानोसा घेतल्यास सरकारविषयी असलेली चीड, नाराजी दिसून येते, जाणवते. या साऱ्याचा स्फोट लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने होणार आहे. सत्ताधाऱ्यांना त्यांची जागा दाखवून देण्यासाठी जनता या निवडणुकीचे निमित्त म्हणून वापर करणार आहे.

सरकारने केवळ आश्‍वासने दिली. त्याची पूर्तता केली नाही. रोजगार निर्मिती होईल असे सांगत साडेसहा वर्षे हे सरकार आहे. मात्र प्रत्यक्षात खासगी क्षेत्रातील रोजगारही आक्रसला आहे, जोडीला महागाई वाढत आहे. त्यामुळे लोक हैराण झाले आहेत. लोकांना केवळ पायाभूत सुविधाच नको असतात त्यांना उत्तम जगण्यासाठी एक वातावरण लागते, रोजगार लागतो, सरकार दरबारी काम वेळच्या वेळी होणारी यंत्रणा लागते. या साऱ्याचा अभाव आज आहे, आज केवळ सगळीकडे केंद्राच्या निधीतून विकासकामे सुरु आहेत पण ग्रामीण भागातील कामे जशीच्या तशी आहेत. त्यामुळे सरकारचा प्राधान्यक्रम काय याचीही शंका येते, असे ते म्हणाले. 

लोकसभा निवडणुकीत दक्षिण गोव्यात कॉंग्रेसचा विजय सुकर आहे. उत्तर गोव्यात मात्र विजयासाठी जरा कष्ट घ्यावे लागणार आहेत असे विरोधी पक्षनेते चंद्रकांत कवळेकर यांनी सांगितले.गोव्याच्या या खासदारांनी राज्याचा एकही प्रश्‍न सोडविला नाही. उल्लेखनीय असे कामही केलेले नाही, अशी टीका त्यांनी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com