काहीही बोलण्याचे स्वातंत्र्य आहे असे वाटते का?

वृत्तसंस्था
शुक्रवार, 21 एप्रिल 2017

फेसबुकवरील पोस्टप्रकरणी रविशंकर यांच्यावर "एनजीटी' संतप्त

नवी दिल्ली: यमुना नदीकिनाऱ्यावर झालेल्या कार्यक्रमात पर्यावरण नियमाचे उल्लंघन झाले असेल, तर कार्यक्रमास परवानगी देणाऱ्यांकडून दंड वसूल करावा, असे मत फेसबुकवर व्यक्त केल्याने संतप्त झालेल्या राष्ट्रीय हरित लवादाने गुरुवारी आर्ट ऑफ लिव्हिंगचे संस्थापक श्री श्री रविशंकर यांना फटकारले. तुम्ही असे समजता का, की स्वातंत्र्य आहे म्हणून मनाला वाटेल तसे बोलू शकता? असा सवाल एनजीटीचे अध्यक्ष, न्यायाधीश स्वतंत्रकुमार यांनी केला.

राष्ट्रीय हरित लवादाने हे मत रविशंकर यांनी गेल्यावर्षी यमुना नदीच्या किनाऱ्यावर आयोजित केलेल्या वर्ल्ड कल्चर फेस्टिव्हलच्या संदर्भात व्यक्त केले होते. जर यमुना नदीची स्थिती इतकी नाजूक होती, तर न्यायालयाने आणि सरकारने त्यांना कार्यक्रमाची परवानगी द्यायची नव्हती, असे रविशंकर यांनी दोन दिवसांपूर्वी फेसबुकवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले होते. पर्यावरणाच्या नुकसानीस सरकार आणि न्यायालय जबाबदार असल्याचा दावा रविशंकर यांनी केल्याने न्यायालयाने नाराजी व्यक्त करत फटकारले.

जर दंड वसूल करायचा असेल तर तो कार्यक्रमास परवानगी देणाऱ्या केंद्र, राज्य आणि हरित लवादाकडून वसूल केला पाहिजे. यमुना नदी शुद्ध आहे, तर त्यांनी आंतरराष्ट्रीय कार्यक्रमांना परवानगी द्यायची नव्हती, असे रविशंकर यांनी म्हटले होते. प्रसंगी जेलमध्ये जाईन, पण एनजीटीने ठोठावलेला एक रुपयाचाही दंड भरणार नाही, अशा शब्दांत रविशंकर यांनी आव्हान दिले होते. दिल्लीतील कार्यक्रमामुळे पयार्वरणाच्या नियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी लवादाने 5 कोटीचा दंड ठोठावला होता. दरम्यान, भाजपचे नेते महेश गिरी यांनी ट्‌विट करत एनजीटीच्या फटकाऱ्याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. हे मत दुर्दैवी आणि गोंधळात टाकणारे आहे, असे गिरी यांनी म्हटले आहे. आर्ट ऑफ लिव्हिंगने अनेक नद्यांना जीवनदान दिले आहे. जगभरात सेवाभावी वृत्तीसाठी प्रसिद्ध असलेल्या संस्थेविरुद्ध व्यक्त झालेले मत पक्षपातीपणा आहे, असेही त्यांनी नमूद केले. दरम्यान, आर्ट ऑफ लिव्हिंगच्या प्रवक्‍त्याने एनजीटीच्या मताशी सहमत नसल्याचे स्पष्ट केले आहे. न्यायालयाचे खरे मत शेवटच्या आदेशात स्पष्ट होईल, असे म्हटले आहे. पुढील सुनावणी 7 मे रोजी होणार आहे.