काळ्या पैशावाल्यांना सोडणार नाही

काळ्या पैशावाल्यांना सोडणार नाही

पंतप्रधानांचा इशारा; आणखी 'सर्जिकल स्ट्राइक'चे सूतोवाच


टोकियो/ नवी दिल्ली - पूर्वी लोक गंगेमध्ये चार आणे टाकायला कचरत असत, आता तीच मंडळी नोटा अर्पण करू लागली आहेत. आम्ही स्वातंत्र्यानंतरचे सर्व रेकॉर्ड तपासणार आहोत. जर मला हिशेब मिळाला नाही, तर काळ्या पैशावाल्यांना सोडणार नाही, असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी दिला. त्याचवेळी त्यांनी 30 डिसेंबरनंतर आणखी आर्थिक सर्जिकल स्ट्राइकचे सूतोवाचही केले.

जपानमधील कोबे येथे अनिवासी भारतीयांना उद्देशून भाषण करताना सरकारने नोटाबंदीच्या घेतलेल्या निर्णयाला मोदींनी देशातील सर्वांत मोठी स्वच्छता मोहीम असल्याचे म्हटले आहे. काळा पैसा रोखण्यासाठी 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा बंद केल्यानंतर त्या गंगेत वाहत असल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या. यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भ्रष्टाचारी आणि त्यातून कमावलेला काळा पैसा बाळगणाऱ्यांना चिमटा काढला. याआधी गंगेत कुणी एक रुपयाही टाकत नव्हता. आता 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा वाहत आहेत, असे मोदी म्हणाले.

पंतप्रधान म्हणाले, 'सरकारने हा निर्णय काळ्या पैशांची साफसफाई करण्यासाठी घेतला आहे. नोटा बंदीच्या निर्णयाचा त्रास होत असताना देखील लोक आमच्या बाजूने उभे राहिले. देशातील सव्वाशे कोटी नागरिकांना माझा सलाम. सरकार देखील प्रामाणिक लोकांच्या पाठीशी असेल. सध्या देशामध्ये मोठे स्वच्छता अभियान सुरू असून ते कोणाला त्रास देण्यासाठी नाही. आमच्या देशातील गरिबांनी आता खरी श्रीमंती दाखविली. याच लोकांनी 45 हजार कोटी रुपये आपल्या खात्यांमध्ये जमा केले. हा एका रात्रीमध्ये घेतलेला निर्णय नाही. त्यापूर्वी आम्ही एक योजना आणली. सर्वांना संधी दिली नाही, असे झाले नाही.''

जनक्षोभ उसळला
भारतामध्ये आज सलग तिसऱ्या दिवशी नव्या नोटांसाठी सामान्य माणसाची सुरू असलेली होरपळ कायम होती. देशभरात बॅंका, "एटीएम' मशिनसमोर लोकांच्या अक्षरश: रांगा लागल्या होत्या. अनेक ठिकाणांवर सकाळी "एटीएम' मशिन सुरू झाले खरे; पण त्यातही अवघ्या काही तासांत खडखडाट झाल्याने लोकांचा संयम सुटला.

केरळमधील कोल्लाम येथे संतप्त जमावाने बॅंकेच्या कार्यालयाची तोडफोड केली तर अन्य काही ठिकाणांवर वैतागलेले लोक सरकारला शिव्यांची लाखोली वाहताना दिसले. मध्य प्रदेशात पैसे नसल्याने काही ठिकाणी अन्नधान्यांच्या दुकानांची लुटालूट झाली. पश्‍चिम बंगालमध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ नये म्हणून अनेक बॅंकांभोवती कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

शनिवारी दुपारी बारा वाजेपर्यंत देशभरातील विविध बॅंकांमध्ये 2 लाख कोटी रुपये जमा झाले होते. गुजरातमध्ये अनेक ठिकाणांवर बॅंक कर्मचाऱ्यांना जनतेच्या रोषास सामोरे जावे लागले. संतप्त जमावाने कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की केल्याने पोलिसांनी सौम्य लाठीमार करत अनेक जणांना ताब्यात घेतले.

नोटांअभावी बेहाल

  • "वीकेंड'मुळे "एटीएम' मशिन्स काही क्षणांत रिक्त
  • पैशांअभावी व्यापारपेठांतील व्यवहार थंडावले
  • मिर्झापूरमध्ये गंगेत आढळल्या हजारांच्या नोटा
  • ंमुंबईत रुग्णालयाने उपचार नाकारल्याने अर्भकाचा मृत्यू
  • सरकारच्या नोटाबंदीचे आमीर खानकडून समर्थन
  • नव्या नोटांसाठी एटीएम मशिन्स अनुकूल नाहीत
  • प्रदेशात लोकांनी पैशांअभावी धान्याचे दुकान लुटले
  • "जनधन' खात्यांमधून काळे पैसे होतायत पांढरे

मोदी म्हणाले...

  • - सरकार प्रामाणिक लोकांच्या पाठीशी
  • - 30 डिसेंबरनंतर आणखी काही निर्णय घेतले जातील
  • - भीतीपोटी लोक आता गंगेत पैसे फेकत आहेत
  • - नोटाबंदीनंतर देशातील जनतेला माझा सलाम
  • - नोटाबंदीचा त्रास होऊनदेखील जनता निर्णयाच्या बाजूने
  • - देशाला गरिबीपासून मुक्ती मिळवून द्यायची आहे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com