आधार व्होटर आयडीशी जोडू नका: मंत्री रविशंकर प्रसाद

वृत्तसंस्था
सोमवार, 2 एप्रिल 2018

आधार कार्ड आणि व्होटर आयडी एकमेकांशी जोडण्यास माझा वैयक्तिकरित्या विरोध आहे. कारण मतदार निवडणूक ओळखपत्र (ईपीआयसी कार्ड) आणि आधार कार्ड वेगवेगळ्या उद्देशाने काम करतात

नवी दिल्ली: आधार कार्ड आणि व्होटर आयडी एकमेकांशी जोडण्यास माझा वैयक्तिकरित्या विरोध आहे. कारण मतदार निवडणूक ओळखपत्र (ईपीआयसी कार्ड) आणि आधार कार्ड वेगवेगळ्या उद्देशाने काम करतात, असे केंद्र सरकारचे माहिती तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद  म्हणाले. 

प्रसाद म्हणाले की, ''माझ्या वैयक्तिक मतानुसार मतदारार निवडणूक ओळखपत्र आधार कार्डशी जोडले जाऊ नये. मात्र मी केंद्र सरकारचा एक माहिती तंत्रज्ञान मंत्री म्हणून हे सांगत नाही असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. शिवाय आम्ही आधार कार्ड आणि व्होटर आयडी एकमेकांशी जोडण्यास सांगितल्यास विरोधक पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकांवर नजर ठेवत असल्याचा आरोप करतील. म्हणजेच सामान्य लोक काय करताय? ते कोणता सिनेमा बघताय वगैरे अशा गोष्टींवर मोदी लक्ष ठेवून आहेत असे अनेक प्रकारचे आरोप विरोधक मोदींवर करतील.''

 "ईपीआयसी कार्ड भारताच्या निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळाशी (वेब पोर्टल) जोडण्यात आले आहे आणि तुम्हाला निवडणूक संबंधित माहिती जसे की आपल्या मतदान केंद्र आणि त्याचा पत्ता मिळेल. शिवाय याचा आणि आधार कार्डचा काहीही संबंध नाही, "असेही ते म्हणाले. मात्र बँकेचे खाते आधार कार्डशी जोडण्याचे त्यांनी समर्थन केले आहे. बँक खाते आणि आधार कार्ड जोडणीमुळे कल्याणकारी योजनांचा फायदा प्रत्यक्ष लोकांपर्यंत पोचतोय अथवा नाही हे कळण्यास मदत होईल. 

Web Title: Don't link Aadhaar with voter IDs Ravi Shankar Prasad