अमेठीत काँग्रेसच्या गडाला भाजपचा सुरूंग

टीम ई सकाळ
शनिवार, 11 मार्च 2017

अमेठी : काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांचा लोकसभा मतदारसंघ असलेल्या अमेठीत काँग्रेसच्या गडाला सुरुंग लावण्यात भाजपला यश आले आहे. अमेठी लोकसभा मतदारसंघातील चार पैकी तीन जागांवर भाजप उमेदवार आघाडीवर आहेत.

अमेठी : काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांचा लोकसभा मतदारसंघ असलेल्या अमेठीत काँग्रेसच्या गडाला सुरुंग लावण्यात भाजपला यश आले आहे. अमेठी लोकसभा मतदारसंघातील चार पैकी तीन जागांवर भाजप उमेदवार आघाडीवर आहेत.

अमेठीचे राजा संजय सिंग यांची पहिली पत्नी (माजी पंतप्रधान विश्वनाथ प्रताप सिंग यांची भाची) राणी गरिमा सिंग आणि दुसरी पत्नी राणी अमिता सिंग - कुलकर्णी या दोघींमध्ये प्रामुख्याने लढाई होती. यांच्याबरोबर समाजवादी पक्षाचे गायत्री प्रजापती हेही मैदानात होते. समाजवादी पक्ष आणि काँग्रेसची आघाडी असताना याठिकाणी मात्र दोन्ही पक्ष एकमेकांविरूद्ध निवडणुकीच्या रिंगणात उभे होते. गरिमा सिंग यांनी मोठी आघाडी घेत अमेठीच्या हवेलीवर आपले वर्चस्व सिद्ध केले आहे.

भाजपने अमेठीत स्थानिक राजाबरोबरच गांधी घराण्यालाही झटका देत अमेठी लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या जगदीशपूर, तिलोई या मतदारसंघातही भाजपचे उमेदवार आघाडीवर आहेत. तर, गौरीगंज मतदारसंघात सप आणि काँग्रेस आघाडीचे उमेदवार आघाडीवर आहेत. त्यामुळे अमेठीतील चार पैकी तीन जागांवर यश मिळवत भाजपने राहुल गांधींसमोर आव्हान उभे केले आहे.

गेल्या निवडणुकीत अमेठी आणि रायबरेली या काँग्रेसच्या गडात 10 पैकी 8 जागी समाजवादी पक्षाने आणि 2 जागी काँग्रेसने यश मिळविले होते. मात्र, यावेळी या दोन्ही पक्षांची आघाडी असूनही विजय मिळविण्यात अपयश आले आहे.