उत्तर प्रदेशात कमळ फुलले; आली मोदीलाट..!

टीम ई सकाळ
शनिवार, 11 मार्च 2017

देशातील राजकीय दृष्टया सर्वांत संवेदनशील राज्य असलेल्या उत्तर प्रदेशमधील निवडणुकीचा प्राथमिक कल आता स्पष्ट होऊ लागला आहे. देशात 2019 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीआधीची सर्वांत महत्त्वाची निवडणूक मानली जाणाऱ्या उत्तर प्रदेशमध्ये भारतीय जनता पक्ष (भाजप) पूर्ण बहुमत स्थापन करण्याच्या जवळ येऊन पोहोचला आहे.

देशातील राजकीय दृष्टया सर्वांत संवेदनशील राज्य असलेल्या उत्तर प्रदेशमधील निवडणुकीचा प्राथमिक कल आता स्पष्ट होऊ लागला आहे. देशात 2019 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीआधीची सर्वांत महत्त्वाची निवडणूक मानली जाणाऱ्या उत्तर प्रदेशमध्ये भारतीय जनता पक्ष (भाजप) पूर्ण बहुमत स्थापन करण्याच्या जवळ येऊन पोहोचला आहे.

403 जागा असलेल्या उत्तर प्रदेशमधील सुमारे 343 जागांवर सुरु असलेल्या मतमोजणीमध्ये भाजपने तब्बल 238 जागांवर आघाडी घेतली आहे. समाजवादी पक्ष व कॉंग्रेस या पक्षांच्या युतीस अवघ्या 64 जागांवर आघाडी असल्याचे दिसून आले असून; मायावती यांच्या बहुजन समाज पक्षास मोठा फटका बसल्याचे दिसून आले आहे. बसपाला अवघ्या 31 जागांवर आघाडी मिळाली आहे. या महत्त्वपूर्ण राजकीय पक्षांखेरीज इतरांना 10 जागांवर आघाडी मिळाल्याचे निष्पन्न झाले आहे. 

अर्थात, मतमोजणीचा हा प्राथमिक कल आहे. राज्यामधील स्पष्ट निकालास अद्यापी अवकाश असला; तरी या कलांमधून भाजपसाठी राज्यात एका मोठ्या, ऐतिहासिक विजयाची स्पष्ट लक्षणे आहेत. 

पंजाब, उत्तराखंड, गोवा व मणिपूर या राज्यांसहित उत्तर प्रदेश राज्याची निवडणूक राष्ट्रीय पातळीवरील राजकारणाच्या दृष्टिकोनामधूनही अर्थातच अत्यंत महत्त्वाची आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारसाठी उत्तर प्रदेशची निवडणूक अत्यंत संवेदनशील व आव्हानात्मक असल्याचे मानले जात आहे.

गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये या राज्यामध्ये भाजपने 72 जागा मिळवित नेत्रदीपक विजय प्राप्त केला होता. आता विधानसभा निवडणुकीमध्ये या विजयाची पुनरावृत्ती भाजपला करता येईल; अथवा नाही, हे पाहणे अत्यंत औत्सुक्‍याचे ठरणार आहे. पंतप्रधान व भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या नेतृत्वासाठीही उत्तर प्रदेश ही मोठी कसोटी असल्याचे मानण्यात येत आहे. या पार्श्‍वभूमीवर, आत्तापर्यंत आलेला कल हा भाजपचे उत्तर प्रदेशमधील वर्चस्व पुन्हा स्पष्ट करणारा आहे, असे म्हणावयास हरकत नाही.