निकालादिवशी बसप, सपला बसेल शॉक : नरेंद्र मोदी 

वृत्तसंस्था
शुक्रवार, 3 मार्च 2017

'विजेच्या वायरला हात लावून पाहा वीज आहे की नाही, असे अखिलेश आपल्याला म्हणाले होते. मात्र त्यांचे मित्र राहुल गांधी यांनी एक वर्षापूर्वी जाहीर सभेत हा प्रश्न मांडला होता. त्या वेळी तारेला हात लावून त्यात वीज नसल्याचेही स्पष्ट झाले होते. मग आता मला खरेच हात लावून हे तपासण्याची गरज आहे का?

मिर्झापूर : विधानसभा निवडणुकीचा निकाल 11 मार्च रोजी जाहीर होणार असून, त्या वेळी समाजवादी पक्ष (सप) व बहुजन समाजवादी पक्षास (बसप) जोरदार झटका बसेल, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज केले. 

विकासाबाबतीत मागास असलेल्या राज्याच्या पूर्व भागात असलेली विजेची समस्या हेरून मोदींनी सप व बसपवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, ''विजेच्या वायरला हात लावून पाहा वीज आहे की नाही, असे अखिलेश आपल्याला म्हणाले होते. मात्र त्यांचे मित्र राहुल गांधी यांनी एक वर्षापूर्वी जाहीर सभेत हा प्रश्न मांडला होता. त्या वेळी तारेला हात लावून त्यात वीज नसल्याचेही स्पष्ट झाले होते. मग आता मला खरेच हात लावून हे तपासण्याची गरज आहे का? या निवडणुकीत येथील जनताच तुम्हाला शॉक देईल.' 

राहुल गांधी यांच्या खाट सभेवेळी लोकांनी खाटा पळविल्या, त्या आपल्या आहेत ते त्यांना तेव्हाच समजले. आता हीच जनता कॉंग्रेसला पराभूत करेल, असा विश्वासही मोदींनी या वेळी बोलताना व्यक्त केला. 

मोदी म्हणाले... 

  • त्यांना पराभूत केले तरच सुटका 
  • सपकडून विकासकामांच्या फक्त घोषणा 
  • येथील दगडातून मायावतींनी साकारल्या स्वतःच्या मूर्ती 
  • परीक्षेत कॉप्या करण्याचे दरही ठरलेले