'यूपी'त भाजपला मत विभाजनाचा लाभ : शरद पवार

मिलिंद संगई
शनिवार, 11 मार्च 2017

विश्लेषण भाजपला करावे लागेल

गोव्यात इतर पक्षांना मिळालेले यश उल्लेखनीय आहे. माजी मुख्यमंत्री आता संरक्षणमंत्री आहेत असे असताना त्यांच्या पक्षाच्या मुख्यमंत्रिपदाच्या, तसेच उत्तराखंडमध्येही मुख्यमंत्रिपदाच्या व्यक्तीला पराभवाला सामोरे जावे लागते याचे विश्लेषण भाजपला करावे लागेल.

बारामती : 'स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्ष केंद्रीत केल्याने, तसेच समाजवादी पार्टी - कॉंग्रेस यांच्याशिवाय बहुजन समाज पक्ष आणि अजितसिंह हे स्वतंत्र लढल्यामुळे भाजपला उत्तर प्रदेशात यश मिळणे अपेक्षितच होते, अर्थात उत्तर प्रदेश वगळता इतर ठिकाणचा निकाल संमिश्र म्हणावा लागेल,' अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आज दिली.

उत्तर प्रदेशसह पाच राज्यांतील निकालांबाबत बोलताना शरद पवार यांनी आज प्रतिक्रिया दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत: उत्तर प्रदेशात लक्ष केंद्रीत केलेले होते, एकाच मतदारसंघात त्यांनी तीन दिवस दिले होते. अर्थात त्यांनी आपल्या पक्षाला बहुमत मिळवून देण्यासाठी असे करणे गैर नाही, त्याचा फायदा भाजपला झाला. आता उत्तर प्रदेशातील विकासावर या पक्षाला अधिक लक्ष केंद्रीत करावे लागेल, लोकांचीही तशी अपेक्षा असेल असे पवार म्हणाले.

सीमेवरील राज्य तसेच अन्नधान्याच्या बाबतीतील एक सक्षम राज्य म्हणून पंजाबकडे पाहिले जाते, येथील जनतेने कॉंग्रेसवर विश्वास व्यक्त केला आहे, साहजिकच आता कॉंग्रेसची जबाबदारी येथे वाढेल.

गोव्यात इतर पक्षांना मिळालेले यश उल्लेखनीय आहे. माजी मुख्यमंत्री आता संरक्षणमंत्री आहेत असे असताना त्यांच्या पक्षाच्या मुख्यमंत्रिपदाच्या, तसेच उत्तराखंडमध्येही मुख्यमंत्रिपदाच्या व्यक्तीला पराभवाला सामोरे जावे लागते याचे विश्लेषण भाजपला करावे लागेल.

अर्थात या सर्व निकालाने मी फार उत्साही नाही आणि फार नाउमेदही नाही अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली. ईव्हीएम मशीनमधील घोटाळ्यांबाबतच्या तक्रारींबाबत विचारले असता, पराभव झाल्यानंतर कामकाजात दुरुस्ती करुन पुढं जायचं असतं या बाबत तक्रारी करु नयेत असेही ते म्हणाले.

इच्छा असेल तर मार्ग निघेल

भाजपाने उत्तरप्रदेशात आपल्या जाहिरनाम्यात कर्जमाफीचा उल्लेख केला आहे, आम्ही सरकारमध्ये होतो त्या वेळेस सत्तर हजार कोटींचे कर्ज माफ केलेच होते, त्या मुळे सरकारच्या मनात आले तर कर्जमाफी करणे अवघड नाही गरज आहे ती इच्छाशक्तीची असे वक्तव्य शरद पवार यांनी केले.

राज्यात काही परिणाम नाही

या निकालाने राज्यातील राजकारणावर काही परिणाम होणार नाही, उलट या निकालाने शिवसेनेला आनंद होईल की माहिती नाही पण भाजपाला मात्र नक्की आनंद होईल, असेही ते म्हणाले.

Web Title: elections results are mixed, says sharad pawar