ट्विटवर #ArnabDidIt चे वादळ!

शुक्रवार, 22 सप्टेंबर 2017

या ट्विटयुद्धाची सुरूवात अर्णब यांच्या एका व्हिडिओने झाली. या व्हिडिओमध्ये 2002 च्या गुजरात दंगलीचा संदर्भ आहे. 

राष्ट्रीय पातळीवरील प्रख्यात पत्रकारांमध्ये सुरू असलेल्या शाब्दिक युद्धामुळे सोशल मीडिया गेले दोन दिवस भलताच तापला आहे. विशेषतः ट्विटर त्याचे पडसाद ट्रेन्डमधून सातत्याने दिसत आहेत. प्रख्यात पत्रकार आणि रिपब्लिक टीव्ही या वृत्तवाहिनीचे प्रमुख अर्णब गोस्वामी आणि पत्रकार राजदीप सरदेसाई यांच्यातील शाब्दिक युद्धाचे हे परिणाम आहेत. 

या ट्विटयुद्धाची सुरूवात अर्णब यांच्या एका व्हिडिओने झाली. या व्हिडिओमध्ये 2002 च्या गुजरात दंगलीचा संदर्भ आहे. 

आपण कव्हरेजसाठी गेलो असताना 'त्रिशुलधारी' हिंदुत्ववाद्यांनी आपल्या मोटारीवर कसा हल्ला केला, याचे वर्णन अर्णब या व्हिडिओमध्ये कोणत्यातरी कार्यक्रमात करताना दिसतात. गुजरातचे तत्कालिन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानापासून पन्नास मीटरवर ही घटना घडल्याचे अर्णब व्हिडिओमध्ये सांगतात. आम्ही पत्रकार असल्याचे सांगून आणि आमचे पत्रकारांचे कार्ड दाखवून जमावातून सहिसलामत बाहेर पडलो...आमच्या ड्रायव्हरकडे कार्ड नव्हते; त्याने त्याच्या दंडावर 'हे राम' लिहिलेला टॅटू जमावाला दाखवला आणि सुटका करून घेतली, असे अर्णब व्हिडिओमध्ये सांगतात. 

राजदीप सरदेसाई यांच्या '2014 : द इलेक्शन्स दॅट चेंज्ड इंडिया' या पुस्तकात या प्रसंगाचे सविस्तर वर्णन आहे. अर्णब यांचा हा व्हायरल व्हिडिओ राजदीप यांच्या नजरेस नुकताच पडला आणि राजदीप यांनी काही खुलासे ट्विटरवरून केले. 

अर्णब यांनी गुजरात दंगल कव्हर केलेलीच नव्हती आणि ते खोटारडे आहेत, असा आरोप राजदीप यांनी ट्विटरवरून केला. 

त्यानंतर ट्विटरवर अर्णब समर्थक आणि राजदीप समर्थक यांच्यात जणू शब्द-चित्र युद्धच सुरू झाले आहे. 

#ArnabDidIt या हॅशटॅगवर हजारो ट्विटर युजर्सनी आपापल्या गटाचे समर्थन सुरू केले आहे. केवळ विखारीच नव्हे; तर भन्नाट विनोदी कल्पना लढवून अर्णब यांची खिल्लीही उडवली आहे. अर्णब जगातील कोणत्याही महत्वाच्या घटनांचे साक्षिदार बनतात, अशी थीम घेऊन अनेकांनी विनोदी ट्विट केलेले आहेत.