आता मत दिले, की पावती मिळणार..!

EVM
EVM

नवी दिल्ली : इलेक्‍ट्रॉनिक मतदान यंत्रांच्या (ईव्हीएम) बाबतीत निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्‍वभूमीवर आगामी सर्व निवडणुकांत 'ईव्हीएम'मध्ये मत दिल्याची पावती दाखविणारी यंत्रणा-'व्हीव्हीएपीटी' बसविण्यात येईल असे आश्‍वासन निवडणूक आयोगाने देशभरातील राजकीय पक्षांना आज दिले.

'ईव्हीएम'बाबत दिल्लीत झालेल्या बैठकीत आयोगाच्या तज्ज्ञांनी 'ईव्हीएम'बाबत एक तांत्रिक सादरीकरणही केले. बहुतांश पक्षांनी निवडणूक प्रक्रिया संपूर्ण पारदर्शक असावी व राजकीय पक्षांना उद्योजकांकडून मिळणाऱ्या निधीचा तपशील देण्याची अट रद्द करण्याचा केंद्राचा निर्णय रद्द करावा, अशा मागण्या केल्या.

तृणमूल कॉंग्रेस, बसप व 'आप'सह काही पक्षांनी पुन्हा मतपत्रिकांद्वारे मतदान घेण्याची जोरदार मागणी केली. 

कॉन्स्टिट्यूशन क्‍लबच्या विस्तारित कक्षात सकाळी दहापासून सुमारे साडेसात तास चाललेल्या या बैठकीत 'ईव्हीएम'मध्ये गैरप्रकार करून दाखविण्याचे आव्हान (हॅकेथॉन) आयोगाने स्वीकारले व नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांत वापरलेली यंत्रे हॅक करून दाखवावीत, असे आव्हान दिले. मात्र यासाठीच्या बैठकीची तारीख आयोगाने जाहीर केली नाही.

केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त नसीम झैदी यांच्यासह सर्व निवडणूक आयुक्तांसह सात राष्ट्रीय व 49 प्रादेशिक पक्षांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. कॉंग्रेसचे विवेक तनखा, भाजपचे भूपेंद्र यादव व व्ही. एल. नरसिंह राव, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वंदना चव्हाण व डी. पी. त्रिपाठी, शिवसेनेचे अनिल देसाई, माकपचे नीलोत्पल बसू, बसपचे सतीशचंद्र मिश्रा, 'आप'चे मनीष सिसोदिया व सौरभ भारद्वाज, अण्णा द्रमुकचे थंबी दुराई व डॉ. मैत्रेयन, द्रमुकचे तिरूची सिवा, जेडीयूचे के. सी. त्यागी आदी प्रमुख नेते सहभागी झाले होते. 

झैदी यांनी बैठकीनंतर सांगितले, की आयोगाला सर्व पक्ष समान आहेत व सर्वांना आयोग समान अंतरावरच ठेवतो. 'ईव्हीएम' संपूर्ण सुरक्षित असून, त्यात गैरप्रकार संभवत नाही या मुद्द्यावर आयोग ठाम आहे. राजकीय पक्षांना याबाबत वाटणाऱ्या काळजीची आयोगाने योग्य दखल घेतली आहे व शंकांचे निरसन करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. यापुढील सर्व निवडणुका 'व्हीव्हीएपीटी'द्वारेच होतील. 
या बैठकीनंतर तनखा यांनी पारदर्शिकतेच्या मुद्द्यावर जोर देऊन सांगितले, की निवडणूक प्रक्रिया, राजकीय निधी, मतगणना व निकालांची घोषणा या सर्वच पातळ्यांवर संपूर्ण पारदर्शकता असावी. माकप, जेडीयू आदी पक्षांनी कॉर्पोरेट फंडिंगचा मुद्दा जोरदारपणे मांडला. 

वंदना चव्हाण यांनी 'व्हीव्हीएपीटी' सार्वत्रिक करण्याच्या निर्णयाचे स्वागत केले. त्यांनी सांगितले, की यातील पावती केवळ सात सेकंदच बाहेर दिसू शकते. मात्र देशातील कित्येक मतदार निरक्षर असतात त्यांना हे कसे कळणार? पुणे महापालिका निवडणुकीत पडलेली एकूण मते व मतमोजणीतील मते यात प्रचंड तफावत आढळली होती. आयोगाने या शंकांचे समाधानकारक निरसन केले पाहिजे. देसाई यांनीही निवडणूक यंत्रणेबाबत मतदारांचा विश्‍वास कायम राहावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. सिसोदिया यांनी, 'ईव्हीएम' आमच्या ताब्यात द्या, आम्ही त्यात गैरप्रकार करून नक्की दाखवू, असे पुन्हा आव्हान दिले. 

सादरीकरणातील प्रमुख मुद्दे 

  • प्रत्येक 'ईव्हीएम'च्या कंट्रोल युनिटमध्ये मायक्रो प्रोसेसर बसविलेला असतो. 
  • 'ईव्हीएम'मधील चीप ही एकाच वेळी बसविता व काढता येते. दोनदा प्रोसेसिंग व प्रोग्रॅमिंग केवळ अशक्‍य आहे. 
  • एखाद्या यंत्राचा मदरबोर्ड बदलला, तर ते मतदान यंत्राचे काम करणार नाही. रेडिओचा मदरबोर्ड बसविला तर ते यंत्र रेडिओचे, धुलाई यंत्राचा बसविला तर धुलाई यंत्राचेच काम करेल. 
  • मतदाराने ज्या पक्षासमोरील कळ दाबली असेल त्या मतदानाचीच पावती बाहेर येईल. ती नंतर यंत्रांत सुरक्षित असेल व मतमोजणीवेळी पडताळणीसाठी ती वापरता येऊ शकते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com