मतदानोत्तर चाचण्यांचे कल दबावाखाली बदलले - सप

वृत्तसंस्था
शुक्रवार, 10 मार्च 2017

या मतदानोत्तर चाचण्या मूर्खपणाच्या आहेत. माझ्याकडे अशी माहिती आहे की वृत्तवाहिन्यांनी दबावाखाली खऱ्या मतदानोत्तर चाचण्यांमध्ये बदल केले आहेत.'
- राम गोपाल यादव

नवी दिल्ली - उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठीचे मतदान संपल्यानंतर घेण्यत आलेल्या मतदानोत्तर चाचण्यांमध्ये भारतीय जनता पक्षाच्या बाजूनेच मतदारांनी कल दिल्याचे दिसून येत आहे. या पार्श्‍वभूमीवर समाजवादी पक्षाने या चाचण्या म्हणजे मूर्खपणा असून दबावाखाली या चाचण्या बदलण्यात आल्याची टीका केली आहे.

वृत्तसंस्थेशी बोलताना समाजावादी पक्षाचे नेते राम गोपाल यादव म्हणाले, "या मतदानोत्तर चाचण्या मूर्खपणाच्या आहेत. माझ्याकडे अशी माहिती आहे की वृत्तवाहिन्यांनी दबावाखाली खऱ्या मतदानोत्तर चाचण्यांमध्ये बदल केले आहेत.' यावेळी बोलताना यादव यांनी उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्षच विजयी ठरेल, असा विश्‍वासही व्यक्त केला.

शुक्रवारी संध्याकाळी विविध वृत्तवाहिन्यांनी मतदानोरत्तर चाचणीतून समोर आलेले अंदाज जाहीर केले. सर्वच चाचण्यांमध्ये भारतीय जनता पक्षालाच सर्वाधिक जागा मिळतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. टुडेज चाणक्‍यच्या चाचणीमध्ये भाजपला एकूण 285 जागा मिळतील असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. उत्तर प्रदेश शिवाय मणिपूर, गोवा, उत्तराखंड याठिकाणीही भाजपला सर्वाधिक जागा मिळतील असेही चाचण्यातून समोर आले आहे. तर पंजाबमध्ये आम आदमी पक्षाचे वर्चस्व राहील असे आढळून आले आहे.