'जेडीयू'देखील 'एससीएल'चा लाभार्थी 

Cambridge Analytica
Cambridge Analytica

नवी दिल्ली : फेसबुक डेटा लिक प्रकरणामुळे चर्चेत आलेल्या "केंब्रिज ऍनालिटिका' या संस्थेत जागल्याची भूमिका पार पाडणाऱ्या ख्रिस्तोफर वेईलीने भारतातील "स्टॅटेजिक कम्युनिकेशन लॅबरोटरीज'(एससीएल) च्या विविध प्रकल्पांविषयी अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. कॉंग्रेसप्रमाणेच भाजपचा मित्रपक्ष असणारा संयुक्त जनता दलदेखील या संस्थेचा राजकीय लाभार्थी असल्याचे उघड झाले आहे. 

काही भारतीय पत्रकारांनीच वेईलीकडे संबंधित माहिती उघड करण्याची विनंती केली होती. विशेष म्हणजे वेईली यांनीच काही दिवसांपूर्वी फेसबुकचे डेटा लिक प्रकरण उघड केले होते. याच वेईली यांनी आज ट्विट करून भारतातील कंपनीच्या प्रकल्पाविषयीची गोपनीय माहिती उघड केली असून, नव्या दस्तावेजामध्ये संयुक्त जनता दलाच्या (जेडीयू) नावाचाही उल्लेख असल्याने नितीशकुमार यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

सध्या वेईली हे ब्रिटिश संसदेच्या चौकशीला सामोरे जात आहेत. बिहारमध्ये भाजपचा मित्र पक्ष असलेल्या संयुक्त जनता दलाची 2010 मधील विजयाची रणनीती याच कंपनीने आखली होती. याच फर्मने राज्यातील जातीनिहाय माहिती संकलित केली होती. विशेष म्हणजे याच फर्मने एका राजकीय पक्षाच्या सांगण्यावरून उत्तर प्रदेशमध्ये जातिनिहाय गणनादेखील केली होती; पण यात त्या राजकीय पक्षाचा उल्लेख टाळण्यात आला आहे. "एससीएल ग्रुप' हा "केंब्रिज ऍनालिटिका'ची पितृ संस्था असून तिची भारतातही कार्यालये आहेत. 

देशातील यंत्रणा 
गाझियाबादेतील इंदिरापूरममध्ये या संस्थेचे मुख्यालय असून अहमदाबाद, बंगळूर, कटक, गुवाहाटी, हैदराबाद, इंदूर, कोलकाता, पाटणा आणि पुण्यामध्येही तिची प्रादेशिक कार्यालये आहेत. सध्या "एससीएल इंडिया' या कंपनीकडे देशातील सहाशे जिल्हे आणि सात हजार खेड्यांचा डेटा असल्याचा दावा करण्यात आला आहे. विशेष म्हणजे फेसबुक डेटाचा वापर करणाऱ्या "केंब्रिज ऍनालिटिका'चीही भारतामध्ये कार्यालये असून यासंबंधीचे दस्तावेज संसदीय चौकशी समितीसमोर सादर करण्याची तयारी वेईली यांनी दर्शविली आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com