मोदींना दत्तक घेण्याचा मोदीभक्ताचा प्रयत्न अपयशी

वृत्तसंस्था
बुधवार, 22 फेब्रुवारी 2017

गाझियाबाद - उत्तर प्रदेशचा दत्तक पुत्र असल्याचे विधान करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रत्यक्षात दत्तक घेण्यासाठी उत्तर प्रदेशमधील गायत्री विद्यापीठातील निबंधक आणि मोदींचे चाहते योगेंद्र पाल योगी यांनी केलेला प्रयत्न अपयशी ठरला आहे.

गाझियाबाद - उत्तर प्रदेशचा दत्तक पुत्र असल्याचे विधान करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रत्यक्षात दत्तक घेण्यासाठी उत्तर प्रदेशमधील गायत्री विद्यापीठातील निबंधक आणि मोदींचे चाहते योगेंद्र पाल योगी यांनी केलेला प्रयत्न अपयशी ठरला आहे.

मोदी यांनी उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीच्या एका प्रचारसभेत बोलताना "उत्तर प्रदेशचा विकास राज्याने दत्तक घेतलेला पुत्र करेल' असे विधान केले होते. यावर विरोधकांनी मोदींवर निशाणा साधला आहे. विरोधकांना सडेतोड उत्तर देण्याच्या उद्देशाने योगी यांनी मोदींना दत्तक घेण्याचा निर्णय घेतला. याबाबत बोलताना ते म्हणाले, "दत्तक घेण्याचे वक्तव्य म्हणजे एखाद्या परिसरावरील प्रेम व्यक्त करण्याची पद्धत आहे. ती एखाद्याचा अपमान करण्याची पद्धत नाही.'

मोदींना दत्तक घेण्याची प्रक्रिया पार पाडण्यासाठी योगी उपनिबंधकाच्या कार्यालयात गेले. मात्र, कायदेशीर प्रक्रियेनुसार दत्तक प्रक्रिया सुरू करण्यासाठी ज्यांना दत्तक घ्यायचे आहे, त्यांनी प्रत्यक्ष उपस्थित असणे आवश्‍यक आहे. ही बाब तेथील अधिकाऱ्यांनी योगी यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यामुळे ही दत्तक प्रक्रिया पूर्ण होऊ शकली नाही.

"योगी माझे पिता'; महिलेचा दावा
मोदींच्या दत्तक घेण्यास उत्सुकता दाखविल्यामुळे योगी चर्चेत आले आहेत. मेरठ येथे राहणाऱ्या अलका नावाच्या एका महिलेने योगेंद्र पाल योगी आपले पिता असल्याचा दावा केला आहे. योगी यांनी मोदींना दत्तक घेण्यासाठी सादर केलेल्या कागदपत्रांमध्ये मुलगी म्हणून आपला उल्लेख केला नसल्याचा दावा अलकाने केला आहे.

या संदर्भात योगी यांना दूरध्वनी केला असता त्यांनी आपला फोन घेतला नसल्याचे तिने म्हटले आहे. इतर भावंडांना फोन केला असता त्यांनी समाधानकारक उत्तर दिले नसल्याचा दावा अलकाने केला आहे. आपण विवाहित असून एक मुलगा आणि मुलगी असल्याचेही अलकाने सांगितले आहे. या प्रकरणी न्यायालयात जाण्याची तयारीही अलकाने दर्शविली आहे. 'जो आपल्या मुलीला सांभाळू शकत नाही. तो इतरांना दत्तक कसे घेऊ शकतो?', असा प्रश्‍नही अलकाने उपस्थित केला आहे.

काय म्हणाले होते मोदी?
'बंधूं भगिनींनो! भगवान श्रीकृष्णाने उत्तर प्रदेशच्या जमिनीवर जन्म घेतला. गुजरात त्याची कर्मभूमी होती. मी गुजरातमध्ये जन्म घेतला. उत्तर प्रदेशने मला दत्तक घेतले. माझे किती मोठे भाग्य आहे. ज्यांनी मला दत्तक घेतले आहे असा उत्तर प्रदेश म्हणजे माझे माय-बाप आहे', अशा शब्दांत मोदींनी उत्तर प्रदेशबद्दलच्या भावना व्यक्त केल्या होत्या.