पदवी प्रमाणपत्रासंदर्भात स्मृती इराणींविरुद्ध दिल्ली उच्च न्यायालयात याचिका

वृत्तसंस्था
मंगळवार, 23 मे 2017

शैक्षणिक पदवी प्रमाणपत्रासंदर्भात वेगवेगळे प्रतिज्ञापत्र दिल्याने केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्याविरुद्ध दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.

नवी दिल्ली - शैक्षणिक पदवी प्रमाणपत्रासंदर्भात वेगवेगळे प्रतिज्ञापत्र दिल्याने केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्याविरुद्ध दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.

अहमर खान यांनी इराणींविरुद्ध याचिका दाखल केली आहे. यापूर्वी त्यांनी कनिष्ठ न्यायालयात या संदर्भातच याचिका दाखल केली होती. मात्र, प्रदीर्घ काळ उलटल्याने विद्यापीठातील जुने कागदपत्रे हरविल्याचे आढळून आल्याने न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली होती. इराणी यांना त्रास देण्यासाठी याचिका दाखल केल्याचे म्हणत न्यायालयाने याचिकाकर्त्याला फटकारले होते. मात्र खान यांनी आता उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. उच्च न्यायालयाने कनिष्ठ न्यायालयाने या प्रकरणासंदर्भातील कागदपत्रे मागविली आहेत. या याचिकेची पुढील सुनावणी 13 सप्टेंबर रोजी होणार आहे.

2014 च्या लोकसभा निवडणुकीनंतर इराणी यांच्या शैक्षणिक पात्रतेचा मुद्या चर्चेत आला होता. इराणी यांनी वेगवेगळ्या ठिकाणी निवडणूका लढताना शैक्षणिक पात्रतेबाबतचे प्रतिज्ञापत्र दिली आहेत. दरम्यान दिल्ली विद्यापीठाने इराणी यांच्या 1996 सालच्या "बीए'च्या प्रमाणपत्रासंदर्भातील कागदपत्रे सापडत नसल्याचे स्पष्ट केले आहे.