जवानाचा मृतदेह स्वीकारण्यास कुटुंबीयांचा नकार

वृत्तसंस्था
शनिवार, 4 मार्च 2017

जवानाच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप पुढे आलेले नाही. त्याच्याकडे एक डायरी मिळाली आहे. मात्र, त्यातील मजकूर मल्याळम भाषेत असल्याने त्याची माहिती घेण्याचे काम सुरू आहे. हा जवान मूळचा केरळमधील कोलम येथील रहिवासी आहे.

नाशिक - नाशिक रोड तोफखाना केंद्रातील रॉय मॅथ्यू या जवानाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांना पुन्हा शवविच्छेदनाची मागणी करत मृतदेह स्वीकारण्यास नकार दिला आहे. 

रॉय मॅथ्यू हे काही दिवसांपासून तणावातून बेपत्ता असल्याची तक्रार त्यांच्या कुटुंबीयांनी केरळमधील कोलम (मूळ गाव) येथे दाखल केली होती. त्यामुळे बेपत्ता होण्यापूर्वी त्यांचे कुटुंबीयांशी काही बोलणे झाले होते का, असा प्रश्‍न निर्माण झाला होता. आता त्यांच्या एका नातेवाईकाने म्हटले आहे, की त्यांच्या मृत्यूबद्दल अनेक प्रश्न आहेत. त्यांच्या पत्नी व जवळच्या नातेवाईकांना त्यांचा मृतदेह दाखविण्यात येत नाही. त्यामुळे आम्ही पुन्हा शवविच्छेदनाची मागणी करत आहोत. तोपर्यंत त्यांचा मृतदेह स्वीकारणार नाही.

जवानाच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप पुढे आलेले नाही. त्याच्याकडे एक डायरी मिळाली आहे. मात्र, त्यातील मजकूर मल्याळम भाषेत असल्याने त्याची माहिती घेण्याचे काम सुरू आहे. हा जवान मूळचा केरळमधील कोलम येथील रहिवासी आहे. सुरक्षा व्यवस्थेतील कनिष्ठ कर्मचाऱ्यांच्या समस्यांबाबत देशात ठिकठिकाणी सोशल मीडियाच्या माध्यमातून बोंबाबोंब झाल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. वर्दीच्या आतील दडपशाहीबाबत लष्करातही काही तक्रारी पुढे आल्या आहेत. त्यामुळे काहीशा तशाच प्रकारामुळे आलेल्या तणावातून या जवानाने आत्महत्या केली की आणखी काही कारण आहे, याचा तपास सुरू आहे.